IPL 2025, CSK vs RCB Highlights: कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९६ धावांची मजल मारली. फिल सॉल्ट (३२), विराट कोहली (३१), देवदत्त पड्डीकल (२७) यांची त्याला चांगली साथ लाभली. रजतने ४ चौकार आणि ३ षटकारांसह दिमाखात अर्धशतक झळकावलं. चेन्नईचं क्षेत्ररक्षण गचाळ झालं. नूर अहमदने चांगला फॉर्म कायम राखत ३ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जोश हेझलवूडने ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना माघारी धाडलं. त्यानंतर चेन्नईत नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रचीन रवींद्रचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बंगळुरूकडून हेझलवूडने ३ तर यश दयाळ आणि लायम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Chennai Super Kings VS Royal Challengers Bangalore Highlights: महेंद्रसिंग धोनीचा चेन्नईचा गड भेदण्याचं अवघड लक्ष्य विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अचूक केलं आहे.
बंगळुरूने सांघिक प्रदर्शनाच्या बळावर चेन्नईचं तख्त भेदलं
कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९६ धावांची मजल मारली. फिल सॉल्ट (३२), विराट कोहली (३१), देवदत्त पड्डीकल (२७) यांची त्याला चांगली साथ लाभली. रजतने ४ चौकार आणि ३ षटकारांसह दिमाखात अर्धशतक झळकावलं. चेन्नईचं क्षेत्ररक्षण गचाळ झालं. नूर अहमदने चांगला फॉर्म कायम राखत ३ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जोश हेझलवूडने ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना माघारी धाडलं. त्यानंतर चेन्नईत नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रचीन रवींद्रचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बंगळुरूकडून हेझलवूडने ३ तर यश दयाळ आणि लायम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
बंगळुरूने १७ वर्षानंतर भेदला चेन्नईचा गड
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर बंगळुरूने १७ वर्षानंतर चेन्नईचा गड भेदला आहे.
चेन्नईचा पाय खोलात; धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला
१९७ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईचा अनुभवी शिलेदार आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. धावगतीचं आव्हान प्रति षटकामागे २१वर जाऊन पोहोचलं आहे.
चेन्नई पराभवाच्या छायेत
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. यश दयाळने शिवम दुबेला बाद करत आणखी एक धोकादायक फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. धावगतीचं आव्हान १३पल्याड पोहोचलं आहे.
चेन्नईची पडझड सुरूच; बंगळुरूची दमदार वाटचाल
१९७ धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या चेन्नईने ४ शिलेदार गमावले आहेत. सॅम करनला पाठवण्याचा प्रयोगही फसला. १३ चेंडूत त्याला आठच धावा करता आल्या. लायम लिव्हिंगस्टोनने त्याला बाद केलं.
जोश हेझलवूडचा दणका; ऋतुराज-त्रिपाठी माघारी
उंचपुरा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांनी शरणागती पत्करली.
टीम डेव्हिडचा दणका, बंगळुरूने चेन्नईसमोर ठेवलं १९७ धावांचं लक्ष्य
टीम डेव्हिडच्या ८ चेंडूत २२ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने चेन्नईसमोर १९७ धावांंचं दमदार आव्हान ठेवलं आहे. कर्णधार रजत पाटीदारचं अर्धशतक हे बंगळुरूच्या डावाचं वैशिष्ट्य होतं.
कर्णधार रजत पाटीदारचं अर्धशतक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नेतृत्वाच्या जबाबदारीला न्याय देत अर्धशतकी खेळी साकारली. रजतने पारंपरिक फटक्यांच्या साह्याने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
नूरने पटकावली विराट कोहलीची विकेट
सावध सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीला युवा फिरकीपटू नूर अहमदने तंबूत धाडलं. त्याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली.
देवदत्त पड्डीकल अश्विनची शिकार
रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर कर्णधार ऋतुराज गायकवाडने सुरेख झेल टिपत देवदत्त पड्डीकलला तंबूत पाठवलं. चांगल्या लयीत खेळणाऱ्या देवदत्तने २७ धावा केल्या.
धोनीची पुन्हा एकदा स्टंम्पिंगची कमाल; फिल सॉल्ट माघारी
४२व्या वर्षी चपळतेचा प्रत्यय घडवत महेंद्रसिंग धोनीने फिल सॉल्टला स्टम्पिंग केलं. डावखुरा फिरकीपटू नूर अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा सॉल्टचा प्रयत्न फसला आणि यष्टीपाठी धोनीने आपली कमाल दाखवली. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच धोनीने यष्ट्यांचा वेध घेतला. सॉल्टचा मागचा पाय अवघे काही सेकंद हवेत राहिला, तेवढ्यात धोनीने आपली कमाल दाखवली.
रवीचंद्रन अश्विनच्या पहिल्या षटकात १६ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फिल सॉल्टने चेन्नईच्या रवीचंद्रन अश्विनला लक्ष्य करत पहिल्याच षटकात १६ धावा वसूल केल्या.
फिल सॉल्टची मनमुराद फटकेबाजी
खणखणीत फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फिल सॉल्टने खलील अहमद आणि रवीचंद्रन अश्विन या गोलंदाजांचा समाचार घेत चौकार वसूल केले.
चेन्नईने टॉस जिंकला; गोलंदाजीचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध टॉस जिंकला असून त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ आणि धीम्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं योग्य राहील असं ऋतुराजने सांगितलं.
चेन्नईचं प्रमुख अस्त्र असलेला मथिशा पथिराणा अंतिम अकरात परतला असून, तो नॅथन एलिसच्या जागी खेळणार आहे.
दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गोलंदाजी अनुभवी भुवनेश्वर कुमारच्या समावेशाने बळकट झाली आहे.
थोड्याच वेळात आरसीबी आणि सीएसके भिडणार!
आयपीएल २०२५ हंगामाचा ८वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार बरोबर साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.
चेन्नई सुपर किंग्स संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर संघातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२५ च्या महालिलावात जुना सहकारी रवीचंद्रन अश्विनला सीएसकेने ताफ्यात सामील केलं आहे. आयपीएलच्या सुरुवातीला अश्विन चेन्नई सुपर किंग्जचाच भाग होता. चाळिशीकडे झुकलेल्या अश्विनसाठी चेन्नईने ९.७५ कोटींची बोली लावली. आता जडेजा-अश्विनही फिरकी जोडी सीएसकेच्या ताफ्यात पुन्हा एकत्र दिसेल.
चेन्नईने त्यांचा भरवशाचा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला संघात समाविष्ट केलं. रचीन रवींद्रसाठी त्यांनी राईट टू मॅचचा अधिकार वापरला. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध राहुल त्रिपाठीलाही त्यांनी संघात घेतलं. तब्बल १० कोटी रुपये खर्चून चेन्नईने अफगाणिस्तानचा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदला ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने खलील अहमद या उंचपुऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावरही विश्वास ठेवला आहे. मूळच्या तामिळनाडूच्याच विजय शंकरला चेन्नईने घेतलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जने पाच खेळाडूंना रिटेन केलं. ज्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, शिवम दुबे आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. चेन्नईने रवींद्र जडेजाला १८ कोटी रुपये दिले आहेत. ऋतुराज गायकवाडलाही १८ कोटींना कायम ठेवण्यात आले आहे. मथिशा पाथिरानाला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. शिवम दुबेला १२ कोटी आणि धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
मागील हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचं नेतृत्व सांभाळलं होतं. त्याचा फिटनेस उत्तम आहे. फॉर्मही चांगला आहे मात्र तो चाळिशीत आला आहे. तो आणखी किती वर्ष आयपीएलसारखी दोन महिने चालणारी स्पर्धा खेळू शकतो याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संघाने भविष्याचा विचार करता फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं. तसेच विराट कोहलीसह दोन युवा खेळाडू रजत पाटीदार आणि यश दयाल यांनी रिटेन केलं आहे. बंगळुरू संघाने अष्टपैलू खेळाडू लायम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी रुपये मोजून संघात समाविष्ट केलं. बंगळुरूने धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टला ११.५० कोटी रुपयांची बोली लावून संघात समाविष्ट केलं.
आरसीबीने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांना रिटेन केलं. यानंतर टीमने रजत पाटीदारला ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यश दयाल यालाही संघाने ५ कोटींना संघात कायम ठेवलं. याशिवाय संघाने कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, टीम डेव्हिड, देवदत्त पड्डिकल यांना लिलावात संघात घेतलं.
आरसीबी संघ
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड
महेंद्रसिंग धोनी- विराट कोहली आमनेसामने; चेन्नईचा गड भेदण्याचं बंगळुरूसमोर आव्हान
चेन्नईच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर धावा करणं कठीण मानलं जातं. फिरकीपटू गारुड दाखवत फलंदाजांना माघारी धाडतात. प्रचंड पाठिंबा असणाऱ्या चेपॉकवर धोनी सेनेविरुद्ध चांगलं खेळण्याचं आव्हान बंगळुरूच्या खेळाडूंसमोर आहे. सगळे हंगाम खेळूनही जेतेपदापासून दूर राहिलेल्या आरसीबी संघाला यंदा जेतेपद खुणावतं आहे. दुसरीकडे पाच जेतेपदं नावावर असलेल्या चेन्नईला चाहत्यांसाठी आणखी एक जेतेपद पटकवायचं आहे.