IPL 2025 DC vs LSG : इंडियन प्रीमियर लीगचा थरार गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. या स्पर्धेत आज (सोमवारी) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना खेळवला जात आहे. मात्र सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२५ च्या हंगामातील त्याचा पहिल्याच सामना खेळत नाहीये. यामागे कारण देखील तेवढेच खास आहे.

३२ वर्षीय केएल राहुल सामन्याच्या आदल्या दिवशी संघाला येऊन मिळाला होता. पण राहुल अचानक त्याच्या घरी परतला असून यामागे एक खास कारण समोर आले आहे. राहुल हा त्याची पत्नी अथिया शेट्टीबरोबर राहण्याकरिता घरी परतला असल्याची माहिती समोर आली होती. याचे कारण म्हणजे आथिया ही लवकरच त्यांच्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान इकडे दिल्ली विरूद्ध लखनऊ सामना सुरू असतानाच गोड बातमी मिळाली असून अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आई-बाबा झाले आहेत. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथियाने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अथिया व राहुल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.

केएल राहुल आणि आथिया यांनी लग्नानंतर दोन वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. अथिया शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. आज (२४ मार्च रोजी) या जोडप्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. Blessed With A Baby Girl अशी पोस्ट अथिया व तिच्या पतीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाने राहुलला रिलीज केले होते. यानंतर नंतर दिल्लीच्या संघाने १२ कोटी रुपये मोजून केएल राहुलला आपल्या संघात घेतले आहे. दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी ठरलेल्या भारतीय संघाचा केएल राहुल महत्त्वाचा घटक राहिला आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला राहुल सोमवारी विशाखापट्टणममध्ये त्याच्या माजी फ्रँचायझी लखनऊ विरोधात खेळू शकला नाही.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स : जॅक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

लखनऊ सुपर जायंट्स : एडेन मार्कराम, मिशेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.