IPL 2025, MI VS DC Cricket Score Updates: १२ चेंडूत २३ धावांचं आव्हान असं समीकरण असताना मुंबईसाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर आशुतोष शर्माने दोन चौकार लगावले. पुढच्या तीन चेंडूवर दिल्लीचे तीन फलंदाज रनआऊट झाले आणि मुंबईने थरारक विजय मिळवला.

Live Updates

IPL 2025 Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 

23:30 (IST) 13 Apr 2025

दोन चौकार, तीन रनआऊट आणि दिल्लीने गमावला सामना

दिल्लीला १२ चेंडूत २३ धावांची आवश्यकता होती. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पुढच्या दोन चेंडूवर आशुतोष शर्माने दोन चौकार वसूल केला. विजयाचं पारडं दिल्लीच्या बाजूने होतं. चौथ्या चेंडूवर आशुतोष शर्मा रनआऊट झाला. पाचव्या चेंडूवर कुलदीप यादव रनआऊट झाला. सहाव्या चेंडूवर मिचेल सँटनरने मोहित शर्माला रनआऊट केलं आणि मुंबईने अविश्सनीय विजय साकारला.

23:26 (IST) 13 Apr 2025

3 चेंडूत ३ रनआऊट आणि मुंबईचा अविश्सनीय विजय

३ चेंडूत ३ रनआऊट्स होऊन मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्ध अविश्सनीय असा विजय मिळवला.

23:10 (IST) 13 Apr 2025

करुणच्या खेळीनंतर दिल्लीची घसरगुंडी

करुण नायरच्या झंझावाती खेळीनंतर दिल्लीची घसरगुंडी उडाली आहे. कर्ण शर्माने तीन विकेट्स पटकावत दिल्लीला रोखलं आहे.

22:39 (IST) 13 Apr 2025

सँटनरच्या फिरकीने करुण नायरची अफलातून खेळी संपुष्टात

सात वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत अर्धशतक झळकावणाऱ्या करुण नायरची अफलातून खेळी मिचेल सँटनरच्या फिरकीने संपुष्टात आणली. तीन वर्षानंतर आयपीएलचा सामना खेळणाऱ्या करुणने ४० चेंडूत ८९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. फिरकीचा समर्थपणे सामना करणारा करुण सँटनरच्या चेंडूवर निरुत्तर झाला.

22:05 (IST) 13 Apr 2025

करुण नायरचं २२ चेंडूत अर्धशतक

सात वर्षांच्या कालखंडानंतर करुण नायरने आयपीएल स्पर्धेत अर्धशतकाला गवसणी घातली. जसप्रीत बुमराहसारख्या कसलेल्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत करुणने चौकार, षटकारांची लयलूट केली.

21:55 (IST) 13 Apr 2025

करुण नायरचे बुमराहला दोन चौकार

अनुभवी करुण नायरने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले.

21:49 (IST) 13 Apr 2025

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून करुण नायरला संधी

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतणाऱ्या अनुभवी करुण नायरला दिल्लीने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी दिली आहे.

21:48 (IST) 13 Apr 2025

जेक फ्रेझर मॅकगर्क झटपट तंबूत

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेक फ्रेझर मॅकगर्क झटपट तंबूत परतला आहे.

21:39 (IST) 13 Apr 2025
पहिल्याच चेंडूवर विकेट

मुंबईने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेलची जोडी उतरली होती. तर दीपक चहरने गोलंदाजीला सुरूवात केली आणि विकेट घेतली. पहिल्याच चेंडूवर त्याने जेक फ्रेझर मॅकगर्कला विल जॅक्सकरवी झेलबाद करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

21:20 (IST) 13 Apr 2025

मुंबईने ओलांडला दोनशेचा टप्पा

तिलक वर्मा, रायल रिकलटन, नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळींच्या बळावर मुंबईने दिल्लीविरुद्ध २०५ धावांची मजल मारली.

21:09 (IST) 13 Apr 2025

झेल टिपताना मुकेश कुमार आणि आशुतोष शर्माची टक्कर

१९व्या षटकात, तिलक वर्माने मारलेला फटका अडवताना आशुतोष शर्मा आणि मुकेश कुमार यांच्यात टक्कर झाली.

20:58 (IST) 13 Apr 2025

तिलक वर्माचं अर्धशतक

तिलक वर्माने चांगला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केलं.

20:15 (IST) 13 Apr 2025

कुलदीपने केलं रिकलटनला त्रिफळाचीत

२५ चेंडूत ४१ धावांची खेळी करणाऱ्या रायल रिकलटनला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केलं.

19:57 (IST) 13 Apr 2025

विपराज निगमचा मुंबईला धक्का; रोहित शर्माला केलं बाद

विपराज निगमने अनुभवी रोहित शर्माला बाद करत मुंबईला धक्का दिला आहे. रोहितने १२ चेंडूत १८ धावांची खेळी केली.

19:46 (IST) 13 Apr 2025

रोहित शर्माची आक्रमक सुरुवात

मुंबईचा राजा रोहित शर्माने दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत वेगवान सुरुवात केली आहे.

19:12 (IST) 13 Apr 2025

प्लेइंग इलेव्हन

दिल्लीने टॉस जिंकला असून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयर कोण आहेत.

दिल्ली कॅपिटल्स

जेक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, के.एल.राहुल, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स- समीर रिझवी, करुण नायर, दर्शन नालकांडे, डोनाव्हन फरेरा, दुश्मंत चमीरा

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा, रायल रिकलटन, विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>

इम्पॅक्ट प्लेयर्स- करण शर्मा, कार्बिन बॉश, अश्वनी कुमार, रॉबिन मिन्झ, राज बावा

19:05 (IST) 13 Apr 2025

दिल्लीने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला असून, बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

18:12 (IST) 13 Apr 2025

रोहित शर्माला सूर गवसणार?

टीम इंडियाला टी२० वर्ल्डकपचं जेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा सध्या धावांसाठी झगडताना दिसतो आहे. दिल्लीविरुद्ध रोहितने मोठी खेळी साकारल्यास मुंबईचा विजय सुकर होऊ शकतो.

Mumbai Indians

IPL 2025, DC vs MI Highlights