IPL 2025, GT vs MI Highlights Match Updates: गुजरातने साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९६ धावांची मजल मारली. शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी उपयुक्त खेळी करत त्याला चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादवच्या ४८ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत मुंबईला रोखलं. गुजरातने ३६ धावांनी हा मुकाबला जिंकला.

Live Updates

MI VS GT Highlights IPL 2025: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सचा सामना करायचा आहे.

23:37 (IST) 29 Mar 2025

मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का; सांघिक कामगिरीच्या बळावर गुजरातची सरशी

मुंबई इंडियन्सनने १९७ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना सातत्याने विकेट्स गमावल्या. गुजरात टायटन्स संघाने शिस्तबद्ध गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना रोखलं.

अहमदाबादच्या मैदानावर गुजरातविरुद्धचा मुंबईचा हा चौथा पराभव आहे.

23:19 (IST) 29 Mar 2025

हार्दिक पंड्याही बाद; मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या

मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशा हार्दिक पंड्याच्या विकेटसह मावळल्या. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर स्लाईस करण्याचा हार्दिकचा प्रयत्न मोहम्मद सिराजच्या हातात गेला.

23:14 (IST) 29 Mar 2025

सूर्यकुमार यादव माघारी; प्रसिध कृष्णाने केलं बाद

मुंबई इंडियन्ससाठी जिंकण्याचा मार्ग खडतर होत चालला आहे. प्रसिध कृष्णाने सूर्यकुमार यादवला बाद करत सूर्या-हार्दिक जोडी फोडली. धावगतीचं आव्हान प्रति षटकामागे १६ झालेलं असताना सूर्यकुमारने मोठा फटका खेळला पण तो शुबमन गिलच्या हातात जाऊन विसावला. त्याने ४८ धावांची खेळी केली.

23:09 (IST) 29 Mar 2025

सूर्या-हार्दिकवर मुंबईची भिस्त

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या जोडीवर मुंबईच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. धावगतीचं आव्हान १६वर जाऊन पोहोचलं आहे.

22:58 (IST) 29 Mar 2025

कृष्णाच्या बाऊन्सरने सूर्या घायाळ

धावगतीचं आव्हान झपाट्याने वाढत असताना मोठा फटका खेळण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न फसला. कृष्णाचा उसळता चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून खेळण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न होता. पण चेंडू त्याच्या हेल्मेट ग्रिलवर जाऊन आदळला. मुंबई इंडियन्सच्या मेडिकल टीमने उपचार केले आणि सूर्यकुमार पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला.

22:54 (IST) 29 Mar 2025

रॉबिन मिन्झ प्रयोग अयशस्वी

पॉवरहिटर म्हणून प्रसिद्ध रॉबिन मिन्झला पाठवण्याचा मुंबईचा प्रयोग यशस्वी झाला नाही. साईकिशोरने त्याला बाद केलं.

22:48 (IST) 29 Mar 2025

प्रसिध कृष्णाने तिलक वर्माला दाखवला तंबूचा रस्ता

खेळपट्टीवर स्थिरावून मोठी खेळी करण्यासाठी आतूर तिलक वर्माला प्रसिध कृष्णाने चकवलं. कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल टेवाटियाच्या हातून जाऊन विसावला. त्याने ३९ धावांची खेळी केली.

22:40 (IST) 29 Mar 2025

साई सुदर्शन दुखापतग्रस्त

साई किशोरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने लगावलेला स्वीपचा फटका अडवताना साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाला. सुदर्शनने चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो अडवताना त्याला दुखापत झाली. सकृतदर्शनी तरी हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचा अंदाज आहे. गुजरात संघाच्या मेडिकल टीमने सुदर्शनला उपचारांसाठी नेलं. सुदर्शनच्या जागी ग्लेन फिलीप्स मैदानात बदली खेळाडू म्हणून आला आहे.

22:37 (IST) 29 Mar 2025

सूर्यकुमार-तिलकची भागीदारी न्यारी

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या भागीदारीने मुंबईचा डाव सावरला आहे. १० षटकात मुंबईने ८६ धावांची मजल मारली आहे.

22:17 (IST) 29 Mar 2025

रायन रिकलटन माघारी

मोहम्मद सिराजने रायल रिकटलनला बाद करत मुंबईला आणखी एक धक्का दिला.

22:00 (IST) 29 Mar 2025
३६वर्षीय इशांत शर्मा गोलंदाजीला

१०० कसोटींचा अनुभव असलेल्या इशांत शर्माला गुजरात टायटन्सने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं. कर्णधार शुबमन गिलने चौथ्याच षटकात इशांतला गोलंदाजांसाठी पाचारण केलं.

21:53 (IST) 29 Mar 2025

तिलक वर्माने वसूल रबाडाच्या एका षटकात लगावले २ चौकार आणि १ षटकार

अनुभवी कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने दोन चौकार आणि पाठोपाठ एक षटकार वसूल केला.

21:45 (IST) 29 Mar 2025

दोन चौकार खाल्ल्यानंतर मोहम्मद सिराजचं पुनरागमन; रोहित शर्मा बाद

रोहित शर्माने दोन खणखणीत चौकारांसह आक्रमक सुरुवात केली पण मोहम्मद सिराजने खचून न जाता अफलातून चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केलं.

21:34 (IST) 29 Mar 2025

सत्यनारायण राजूला लास्ट ओव्हर देण्यावरून टीका

अनुनभवी सत्यनारायण राजूला शेवटचं षटक दिल्यावरून मुंबई इंडियन्सवर टीका होत आहे. मुंबईचे अनुभवी गोलंदाज हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्टआणि दीपक चहर यांची षटकं संपली होती. मिचेल सँटनरचं एक षटक बाकी होतं. हार्दिकने राजूच्या कौशल्यावर विश्वास ठेवला. त्याने शेवटच्या षटकात १० धावा दिल्या. आंध्र प्रदेश प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काऊटने राजूला टिपलं.

21:31 (IST) 29 Mar 2025

गुजरातने मुंबईला दिलं १९७ धावांचं लक्ष्य

गुजरात टायटन्सने अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला १९७ धावांचं लक्ष्य दिलं आहे. साई सुदर्शनने ६३ धावांची दिमाखदार खेळी साकारली. शुबमन गिलने ३८ तर जोस बटलरने ३९ धावा केल्या. मुंबईकडून हार्दिकने २ विकेट्स घेतल्या.

21:19 (IST) 29 Mar 2025

दोन चेंडूत दोन विकेट्स

मुंबई इंडियन्स शेरफन रुदरफोर्ड आणि राहुल टेवाटिया यांना माघारी धाडत धावसंख्या दोनशेपार जाणार नाही याची काळजी घेतली.

21:12 (IST) 29 Mar 2025

साई सुदर्शन तंबूत

ट्रेंट बोल्टच्या भेदक यॉर्करवर साई सुदर्शन बाद झाला. सुदर्शनने ४१ चेंडूत ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

20:55 (IST) 29 Mar 2025

शाहरुख खान माघारी

जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शाहरुख खानला हार्दिक पंड्याने बाद केलं. डाऊन द ट्रॅक येत ऑफस्टंप बाहेरचा चेंडू खेळण्याचा शाहरुखचा प्रयत्न फसला.

20:49 (IST) 29 Mar 2025

साई सुदर्शनचं अर्धशतक पूर्ण

डावखुरा सलामीवीर साई सुदर्शनने अर्धशतक पूर्ण केलं. आक्रमक सुरुवात करणाऱ्या सुदर्शननने बटलर स्थिरावल्यानंतर एकेरी दुहेरी धावांवर भर दिला आहे. बटलर बाद झाल्यानंतर सुदर्शनच्या साथीला शाहरुख खान दाखल झाला आहे.

20:47 (IST) 29 Mar 2025

मुजीबने संपुष्टात आणली बटलरची खेळी

धोकादायक ठरू पाहणाऱ्या अनुभवी जोस बटलरला बाद करत मुजीब उर रहमानने मुंबईला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. बटलरने २४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.

20:40 (IST) 29 Mar 2025

जोस बटलरने घेतली सूत्रं हाती; मुंबई ढेपाळलं

सत्यनारायण राजू या अनुनभवी गोलंदाजाच्या स्लोअर बंपर गोलंदाजीवर चौकार वसूल करत बटलरने मोठी खेळी करण्याचे इरादे स्पष्ट केले. बटलरच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुदर्शनने एकेरी, दुहेरी धावा घेत त्याला स्ट्राईक देणं पसंत केलं आहे.

20:33 (IST) 29 Mar 2025

मुंबईचं ढिसाळ क्षेत्ररक्षण

मुंबईच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत जोस बटलरने मोठी खेळी करण्यादृष्टीने आगेकूच केली आहे. मिचेल सँटनरच्या षटकात जोस बटलरने लगावलेल्या फटक्यावर एक धाव अपेक्षित होती मात्र नमन धीर चेंडू अडवू शकला नाही.

20:28 (IST) 29 Mar 2025

जोस बटलरला गवसली लय

मिचेल सँटनरसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला षटकार लगावल्यानंतर गुजरातच्या जोस बटलरला लय गवसली आहे. पहिल्या लढतीत काहीसा संथ खेळणाऱ्या बटलरने या लढतीत आक्रमक सुरुवात केली आहे.

20:17 (IST) 29 Mar 2025

कर्णधारांच्या जुगलबंदीत हार्दिकची सरशी

हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल या कर्णधारांच्या जुगलबंदीत हार्दिकने सरशी साधली. पॉवरप्लेच्या सहा षटकात चौकार वसूल करणाऱ्या गिलचा वेग मंदावला. हार्दिक पंड्याच्या उसळत्या चेंडूवर पूल करण्याचा गिलचा प्रयत्न नमन धीरच्या हातात जाऊन विसावला. गिलने २७ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.

20:03 (IST) 29 Mar 2025

गुजरातला लाभदायक पॉवरप्ले; गिल-सुदर्शनची मनमुराद फटकेबाजी

पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये सगळ्यात कमी स्ट्राईकरेटसाठी गुजरात टायटन्स संघावर टीका केली जाते. शनिवारी शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत ६ षटकात ६६ धावा वसूल केल्या. सुदर्शनने सूत्रधाराची भूमिका घेत फटकेबाजी सुरू केली. गिलने त्याचा कित्ता गिरवत चौकार वसूल केले. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या अनुभवी गोलंदाजांचा सामना करत या जोडगोळीने पॉवरप्लेमध्ये गुजरातला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला.

19:53 (IST) 29 Mar 2025

साई सुदर्शनची आश्वासक सुरुवात

डावखुरा सलामीवीर साई सुदर्शनने पॉवरप्लेच्या षटकांचा पुरेपूर उपयोग करून घेत गुजरातला चांगली सुरुवात करून दिली.

19:29 (IST) 29 Mar 2025

युवा विघ्नेश पुत्तूर संघाबाहेर

चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध ३ विकेट्स पटकावत आयपीएल कारकिर्दीची दिमाखात सुरुवात करणारा विघ्नेश पुत्तूर मुंबई संघात नाहीये. इम्पॅक्ट प्लेयर यादीतही पुत्तूरच्या नावाचा समावेश नाहीये. मुंबई इंडियन्स संघाने पुत्तूरच्या नसण्यासंदर्भात कोणताही माहिती दिलेली नाही पण मैदानावर त्याची अनुपस्थिती दुखापतीची शक्यता दर्शवते.

19:08 (IST) 29 Mar 2025

IPL 2025 GT vs MI Live: गुजरात जायंट्स संघाची प्लेईंग इलेव्हन

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

19:06 (IST) 29 Mar 2025

IPL 2025 GT vs MI Live: मुंबई इंडियन्स संघाची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू

19:06 (IST) 29 Mar 2025

मुंबई इंडियन्सने जिंकली नाणेफेक जिंकली, घेतला गोलंदाजीचा निर्णय

आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IPL 2025, Gujarat Giants vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स