IPL 2025, Varun Chakaravarthy On Ryan Rickelton No Ball Controversy: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. मुंबईने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान मुंबईने ४ गडी राखून पूर्ण केले. या सामन्यात रायन रिकल्टनच्या विकेटवरून गदारोळ झाला. आऊट झाल्यानंतर रिकल्टन मैदानाबाहेर गेला होता. इतक्यात अंपायरने त्याला पुन्हा मैदानात बोलावलं आणि नो बॉल असल्याचं सांगितलं. या चेंडूवर चांगलाच ड्रामा झाला. दरम्यान, अंपायरने घेतलेल्या या निर्णयावरून कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी जोरदार सुरुवात करून दिली. रोहित स्वस्तात माघारी परतला, पण रिकल्टन मोर्चा सांभाळून उभा होता; त्यावेळी पॅट कमिन्सने फिरकी गोलंदाज जीशान अंसारीला गोलंदाजीसाठी बोलावलं. या युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच षटकात रिकल्टनला झेलबाद करून माघारी धाडलं. जीशानच्या गुगलीवर रिकल्टनने कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या पॅट कमिन्सने शानदार झेल घेतला. रिकल्टन मैदान सोडून ड्रेसिंग रुमच्या पायऱ्या चढणार, इतक्यात अंपायरने त्याला थांबवलं आणि हा नो चेंडू असल्याचं सांगितलं. त्यानंतर रिकल्टन पुन्हा एकदा मैदानात आला आणि त्याला फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली.
अंपायरने दिलेला हा निर्णय पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण जीशानने ना लाईन क्रॉस केली होती, ना खांद्याच्या वर चेंडू टाकला होता. ही चूक गोलंदाजाने नव्हे तर यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने केली होती. अनुभवी यष्टीरक्षक क्लासेन यष्टीच्या अगदी जवळून यष्टीरक्षण करत होता, त्यामुळे चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागण्याआधीच त्याचे ग्लोव्हज यष्टीच्या पुढे आले, हे अंपायरच्या निदर्शनास येताच त्यांनी नो चेंडूचा निर्णय दिला.
वरुण चक्रवर्तीने उपस्थित केला प्रश्न
या सामन्यानंतर वरुण चक्रवर्तीने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले, ‘ जर यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज यष्टीच्या पुढे येत असतील तर हा डेड चेंडू असायला हवा. त्यानंतर अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून अंपायरने त्याला चेतावणी द्यायला हवी होती. हा नो चेंडू किंवा फ्री हिट असायला नको होता. यात गोलंदाजाची काय चूक होती? तुम्हाला काय वाटतं?’