IPL आयपीएल २०२५ हंगामाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याच्या वेळापत्रकात बदल केल्याची घोषणा केली आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरच खेळवला जाईल. पण या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.
बीसीसीआयने शुक्रवारी २८ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रकात जाहीर केले की, ६ एप्रिल रोजी होणारा कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स हा सामना आता ८ एप्रिल रोजी खेळवला जाईल. म्हणजेच सामन्याची तारीख बदलली असली तरी ठिकाणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आयपीएल २०२५ चा १९ वा सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना ६ एप्रिलला कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. पण ६ एप्रिलला रामनवमी उत्सव साजरा होणार असल्याने या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याची मागणी कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयकडे केली होती. कोलकाता पोलिसांनी शहरात होणाऱ्या या उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्थेचा हवाला देत या बदलाची मागणी केली होती. तेव्हापासून बीसीसीआयची या सामन्याबाबत सतत चर्चा सुरू होती.
KKR vs LSG सामना कधी, कुठे आणि किती वाजता खेळवला जाणार?
बीसीसीआयचा निर्णय येण्यापूर्वी हा सामना कोलकात्याऐवजी गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण बीसीसीआय, बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि कोलकाता सरकारने अशा अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि हा सामना कोलकात्यातच खेळवला जाईल, असे सांगितले.
बीसीसीआयने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान आपला निर्णय जाहीर केला आणि सांगितले की सामन्याच्या ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही, परंतु रविवार ६ एप्रिलऐवजी हा सामना मंगळवारी ८ एप्रिल रोजी खेळवला जाईल. हा सामना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
यापूर्वी हा सामना रविवारी दुपारी ३.३० वाजता होणार होता. मात्र आता या बदलामुळे रविवारी ६ एप्रिल रोजी एकच सामना होणार आहे. आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार, अहमदाबादमध्ये संध्याकाळी ७.३० वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकमेव सामना खेळवला जाईल.