IPL 2025 Sanjeev Goenka Animated Chat with Rishabh Pant: आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत अद्याप आपल्या कामगिरीने प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेला ऋषभ पंत सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाहीये. त्याच्या नेतृत्त्वावर देखील प्रश्न उभारले जात आहेत. लखनौ संघाला सुरूवातीच्या तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका पंतवरही संतापताना दिसले.
मंगळवारी १ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ १७१ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पंजाबने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला. सामना संपल्यानंतर संजीव गोयंका ऋषभ पंतसह मैदानात उभे असताना दिसले. संघाच्या पराभवानंतर संजीव गोयंका नाराज दिसत होते. ते ऋषभ पंतला हातवारे करूनही काहीतरी सांगताना दिसले.
सामना संपल्यानंतर संजीव गोयंका मैदानावर ऋषभ पंतशी बोलत असताना गोयंका यांनी गतवर्षीच्या राहुल प्रकरणाची पुनरावृत्ती केल्याची चर्चा सोशल मीडियावर केली आहे. गेल्या वर्षी संघ सनरायझर्स हैदराबादविरूद्ध पराभूत झाल्यानंतर संजीव गोयंका राहुलवर भर मैदानात संतापले होते. त्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर बरीच टीका झाली होती. गोयंका मंगळवारी ऋषभ पंतला काय म्हणाले, हे माहित नसलं तरी संघाच्या कामगिरीने ते आनंदी नसल्याचे दिसत होते.
लखनौला दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध अखेरच्या षटकात पराभव पत्करावा लागला, तेव्हा ही गोयंका पंतशी बोलताना दिसले होते. दुसऱ्या सामन्यात लखनौने लखनौने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवून पुनरागमन केले. यानंतर ते पंतला मिठी मारताना दिसले, मात्र मंगळवारी संघाला पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर मात्र संजीव गोयंका पंतवर वैतागताना फोटोमध्ये दिसल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पंत-संजीव गोयंका यांच्या चर्चेचे फोटो पाहताच चाहत्यांनी लखनौच्या मालकांवर टीका केली आहे.
लखनौ सुपर जायंट्ससाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा कर्णधार ऋषभ पंत खराब फॉर्मशी झुंजत आहे. पंजाब किंग्जविरुद्धही तो केवळ २ धावा करून बाद झाला होता. पहिल्या सामन्यात १५ धावा करणाऱ्या पंतला दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. पंत आणि त्याचा संघ संपूर्ण स्पर्धेत कशी कामगिरी करणार, त्यानंतर संजीव गोयंका कसे प्रतिक्रिया देणार, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.