IPL 2025, LSG Vs DC : आयपीएल २०२५ स्पर्धेत आज (सोमवार) लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ विझागमधील एसीए- व्हीडीसीए मैदानावर एकमेकांशी भिडले. दरम्यान फलंदाज ऋषभ पंत हा त्याचा माजी संघ दिल्ली कॅपिटल्सविरोधात पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र २०२५ च्या आयपीएल हंगामातील पहिलाच सामना खेळताना पंत सहा चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

पंत याला १४व्या षटकामध्ये भारतीय क्रिकेटसंघातील त्याचा सहकारी कुलदीप यादवने बाद केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या मेगा ऑक्शनमध्ये २७ वर्षीय पंतला लखनऊच्या संघाने २७ कोटी रुपये खर्चून करारबद्ध केले होते. यामुळे पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान एलएसचीचे चाहते आज पंतकडून एका दमदार खेळीची अपेक्षा करत होते, पण तो शून्यावर बाद झाल्याने त्यांना निराश व्हावे लागले. दरम्यान स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पंत अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.

दरम्यान पहिल्याच सामन्यात शून्य धावांवर बाद झालेल्या पंतला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. वापरकर्ते त्याला २७ कोटी रुपये देऊन विकत घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.

२७ कोटी देऊन खरेदी केलेला खेळाडू श्यून्यावर बाद झाला म्हणत एका वापरकर्त्याने पंतची खिल्ली उडवली आहे.

आज आयपीएल २०२५ चा चौथा सामना खेळवला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ एकमेकांशी भिडले आहेत.

ऋषभ पंत याने २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या वर्षी या संघातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने या फ्रँचायझीसाठी ११२ सामन्यांमध्ये ३२०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

दरम्यान दिल्ली कॅपिटलचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी गेल्या वर्षी आयपीएल २०२५ साठी फ्रँचायझीने पंतला कायम का ठेवले नाही याबद्दल भाष्य केले होते. रिषभ पंत हा संघाचे व्यवस्थापन कसे केले जावे याबद्दल वेगळ्या वेव्ह लेन्थवर होता असे जिंदाल म्हणाले होते. त्यानंतर पंत लखनऊ सुपर जायंट्स संघात सहभागी झाला. लखनऊच्या संघाने त्याच्यावर २७ कोटींची बोली लावली आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.