IPL 2025 Match Fixing: आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. शनिवारी (१९ एप्रिल) राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी झाला होता. या सामन्यात दुसऱ्या इंनिगच्या अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्सचा दोन धावांनी नाट्यमय पद्धतीने पराभव झाला. या पराभवानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सच्या पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हा संघ मॅच फिक्सिंगच्या प्रकारात सामील असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात एलएसजीने राजस्थान रॉयल्सला १८१ धावांचे लक्ष्य दिले होते. यशस्वी जयस्वाल आणि १४ वर्षीय फलंदाज वैभव सुर्यवंशीच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानचा संघ लक्ष्याच्या अतिशय जवळ पोहोचला होता. अखेरच्या षटकात सहा गडी हातात असताना आणि शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरैल सारखे मोठे फटके खेळणारे खेळाडू मैदानात असतानाही अवघ्या दोन धावांनी राजस्थानचा पराभव झाला. शेवटच्या षटकात एलएसजीच्या आवेश खानने यॉर्करचा मारा करत या धावसंख्येचा बचाव करण्यात यश मिळविले. तसेच हेटमायरलाही बाद केले होते.

दरम्यान या पराभवाचा धक्का जसा राजस्थानच्या संघाला बसला, तसाच तो जयदीप बिहानी यांनाही बसला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना संघाचा पराभव कसा काय होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. न्यूज १८ राजस्थानला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाचा वादग्रस्त इतिहासाचाही उल्लेख केला. २०१३ साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात संघाच्या काही खेळाडूंवर कारवाई करण्यात आली होती.

या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर फ्रँचायझीचे मालक राज कुंद्रा यांचेही नाव सट्टेबाजी प्रकरणात घेते होते. त्यामुळे २०१६ आणि २०१७ साली राजस्थान रॉयल्ससह चेन्नई सुपर किंग्ज संघावर बंदी लादली होती. ही आठवण करून देताना बिहानी यांनी ताज्या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी बीसीसीआय आणि इतर यंत्रणांना केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधातही एका धावेमुळे पराभव

अखेरच्या षटकात सामना गमाविण्याची राजस्थान रॉयल्सची ही पहिली वेळ नाही. याआधी १६ एप्रिल रोजीही अखेरच्या षटकात संघाला ९ धावा करता आल्या नव्हत्या. एक धाव कमी झाल्यामुळे सहज जिंकता येणारा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यातही दिल्ली कॅपिटल्सने सहजरित्या सामना जिंकला. लागोपाठ दोन सामन्यात एकाच पद्धतीने पराभव झाल्यानंतर आता संघावर टीका होऊ लागली आहे.

२०१३ रोजी लागला होता स्पॉट फिक्सिंगचा डाग

१२ वर्षांपूर्वीही राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगबद्दल कारवाई करण्यात आली होती. वेगवान गोलंदाज, माजी क्रिकेटपटू, तत्कालीन राजस्थान रॉयल्सचा श्रीसंतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाली होती. तसेच क्रिकेटपटू अंकित चव्हाण आणि अजित चंडालियालाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.