अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गतहंगामात कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरचा यंदा पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना कस लागणार आहे. पंजाबचा संघ नव्या हंगामातील आपल्या मोहिमेची आज, मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीने सुरुवात करेल.

श्रेयसने कर्णधार म्हणून ‘आयपीएल’मध्ये यापूर्वी यशस्वी कामगिरी केली आहे. गतहंगामात कोलकाताने श्रेयसच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. त्याआधी २०२० मध्ये तो कर्णधार असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता पंजाबची १८ वर्षांपासूनची ‘आयपीएल’ जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याची जबाबदारी श्रेयसवर असेल.

पंजाबच्या संघात मोठे बदल करण्यात आले असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या संघाचे प्रशिक्षकपद भूषविणार आहे. अर्शदीप सिंग, शशांक सिंह, प्रभसिमरन सिंग आणि हरप्रीत ब्रार हे चारच खेळाडू गेल्या हंगामानंतर संघात कायम आहेत. गोलंदाजीत यजुवेंद्र चहलची भूमिका निर्णायक ठरेल.

दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ घरच्या मैदानावर सलामीच्या लढतीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. गुजरातची आघाडीची फळी मजबूत दिसत असून गिलच्या साथीने जोस बटलर सलामीला खेळणे अपेक्षित आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी ग्लेन फिलिप्स, राहुल तेवातिया आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर असेल. गोलंदाजीची धुरा रशीद खान, मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा सांभाळतील.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ हॉटस्टार अॅप.

अष्टपैलूंचा भरणा

मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सन, अझमतुल्ला ओमरझाई या अनुभवी अष्टपैलू खेळाडूंचा समावेश ही पंजाबची ताकद आहे. तसेच मुंबईकर सूर्यांश शेडगेला संधी देण्याबाबतही पंजाब विचार करू शकेल.