IPL 2025 Rajasthan Royals Full Squad and Sold Players List : लिलावाच्या पहिल्या टप्प्यात निवांत असणाऱ्या राजस्थान रॉयल्सने उत्तरार्धात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ताफ्यात समाविष्ट केलं आहे. जोफ्रा याआधीही राजस्थानकडून खेळला आहे. जोफ्राच्या सहभागाविषयी अनिश्चितता होती. मात्र लिलावाच्या आधी काही तास जोफ्राला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आणि त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलं. राजस्थानने प्रमुख गोलंदाजांना सोडलं होतं. त्यामुळे आर्चरच्या रुपात त्यांनी मोठं नाव संघात समाविष्ट केलं आहे.
राजस्थानने आर्चरव्यतिरिक्त वानिंदू हासारंगा आणि महेश तीक्षणा या श्रीलंकेच्या फिरकीपटूंना संघात घेतलं. कुमार कार्तिकेय या फिरकीपटूला मुंबईच्या ताफ्यातून आपल्याकडे आणलं. आता संपूर्ण कसा आहे? जाणून घेऊया.
आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेल्या ६ खेळांडूच्या यादीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ज्यामध्ये आर अश्विन आणि युझवेंद्र चहलसारख्या दिग्गजांची नावे समाविष्ट नाहीत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानने गेल्या ९ वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूलाही कायम ठेवले आहे. इतकंच नाही तर गेल्या आयपीएल मोसमातही तो खेळाडू विकला गेला नव्हता, तर एका खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे तो मोसमाच्या मध्यात राजस्थानमध्ये दाखल झाला. या संघाने संजूला सर्वाधिक मानधन दिले नसले, तरी राजस्थान रॉयल्सने प्रथम कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवले आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
कर्णधार संजू सॅमसनशिवाय राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालला संघात कायम ठेवले आहे. रियान पराग, ध्रुव जुरेल हेही संघात कायम आहेत. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलाही कायम ठेवण्यात आले आहे. मोठी बातमी म्हणजे संदीप शर्मालाही कायम ठेवण्यात आले आहे. पैशाबद्दल बोलायचे झाले तर संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना प्रत्येकी १८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर युवा फलंदाज रियान परागला १४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेललाही १४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. शिमरॉन हेटमायरला ११ कोटी आणि संदीप शर्माला ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – IPL 2025 : BCCI कडून आयपीएलच्या पुढील तीन हंगामाचे वेळापत्रक जाहीर? IPL 2025 ‘या’ दिवशी सुरू होणार
राजस्थान संघाने आपला सर्वात मोठा मॅचविनर जोस बटलरलाही बाहेरचा रस्ता दाखवला. बटलरचा फॉर्म आणि फिटनेस पूर्वीसारखा नाही त्यामुळे राजस्थानने हा निर्णय घेतला. संघाने ट्रेंट बोल्टलाही संघाबाहेर ठेवले आहे, हा कठीण निर्णय आहे. आता प्रश्न असा आहे की संघ कोणत्या खेळाडूंवर लिलावात बाजी मारणार आहे. कारण या संघाकडे आता आरटीएम देखील शिल्लक नाही. अशात राजस्थान संघाकडे लिलावातील खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त ४१ कोटी शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ :
कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्शाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुरयना, क्युवान सुर्वेना, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.