IPL 2025, KKR VS MI Highlights: दोन सामन्यात दोन पराभव पदरी पडलेल्या मुंबई इंडियन्सने खणखणीत खेळासह वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघावर दणदणीत विजय मिळवला. पदार्पणवीर अश्वनी कुमारच्या ४ विकेट्सच्या बळावर मुंबईने कोलकाताचा डाव ११६ धावांतच गुंडाळला. रायल रिकलटनच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने ८ विकेट्स राखून विजय साकारला.
IPL 2025, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights
मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय
रायल रिकलटनचं अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या मनमुराद फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १३व्या षटकातच ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
रायल रिकलटन सुसाट; मुंबईची आगेकूच
रायल रिकलटनच्या धुवांधार खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मोठ्या विजयाचा पाया रचला आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर रिकलटनने सूत्रं हाती घेत जोरदार फटकेबाजी केली.
मुंबईची सावध सुरुवात
रोहित शर्मा आणि रायल रिकलटन यांनी छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली आहे.
कोलकाताचं वानखेडेवर लोटांगण; ११६ धावांत खुर्दा, अश्वनी कुमारचं स्वप्नवत पदार्पण
नमन धीरचा शानदार झेल; हर्षित राणा तंबूत
मुंबई इंडियन्सने दिमाखदार सांघिक खेळाच्या बळावर कोलकाताला निष्प्रभ केलं. विघ्नेशच्या गोलंदाजीवर नमन धीरने अफलातून झेल टिपत हर्षित राणाला माघारी धाडलं.
अश्वनी कुमारचा आणखी एक विक्रम
आयपीएल पदार्पणात ४ विकेट्स पटकावणारा अश्वनी कुमार पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
आंद्रे रसेल त्रिफळाचीत
स्वप्नवत पदार्पणवीर अश्वनी कुमारने धोकादायक आंद्रे रसेलला त्रिफळाचीत करत कोलकाताला आणखी एक धक्का दिला.
मिचेल सँटनरचा भेदक मारा
आंद्रे रसेल समोर असतानाही मिचेल सँटनरने अफलातून मारा करत कोलकाताला जखडून ठेवलं. रसेलला यादरम्यान एकदा डीआरएसने जीवदानही मिळालं.
रिंकू सिंग आणि मनीष पांडेही तंबूत
अश्वनी कुमारसाठी आयपीएल पदार्पण स्वप्नवत ठरले. त्याच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येत फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. मनीष पांडे टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर फसला.
मनीष पांडे-रिंकू सिंगने डाव सावरला
८ षटकात निम्मा संघ तंबूत परतल्यानंतरही रिंकू सिंग आणि मनीष पांडे यांनी कोलकाताचा डाव सावरला.
फलंदाजांच्या ऐवजी फलंदाज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्याची कोलकातावर वेळ
आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा उपयोग संघ फलंदाजाऐवजी गोलंदाज किंवा गोलंदाजाऐवजी फलंदाज संघात घेण्यासाठी करतात. कोलकाता नाईट रायडर्सला वानखेडेवर फलंदाजाऐवजी फलंदाज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्याची वेळ ओढवली. १० षटकांच्या आत निम्मा संघ तंबूत परतल्याने अंगक्रिश रघुवंशी बाद झाल्यावर मनीष पांडेला संघात समाविष्ट करण्यात आलं. कोलकाताला आता गोलंदाजी करताना अतिरिक्त गोलंदाज खेळवता येणार नाही.
MI vs KKR Live: केकेआरची पाचवी विकेट
हार्दिक पंड्याच्या सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चांगल्या लयीत असणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीला झेलबाद केलं. यासह मुंबईला पाचवी विकेट मिळाली. केकेआरने ७ षटकांत ५ बाद ४५ धावा केल्या आहेत.
केकेआरचा २३.७५ कोटींच्या बोलीसह संघात घेतलेला वेंकटेश अय्यर ३ धावा करत बाद झाला आणि पुन्हा फेल ठरला. दीपक चहरने सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर झेलबाद केलं.
MI vs KKR Live: पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर विकेट
मुंबई इंडियन्सचा पदार्पणवीर अश्वनी कुमारला पॉवरप्लेमध्येच पहिले षटक दिले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर अचूक कामगिरी केली. अश्वनी कुमारने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेची सर्वात मोठी विकेट मिळवली.
MI vs KKR Live: दीपक चहरच्या खात्यात विकेट
दीपक चहरने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला तर दुसऱ्या चेंडूवर म्हणजेच पहिल्या लीगल चेंडूवर क्विंटन डिकॉकला पदार्पणवीर अश्वनी कुमारने झेलबाद केलं.
नाणेफेक गमावत केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. केकेआरकडून सुनील नरेन आणि क्विंटन डी-कॉकची जोडी मैदानावर उतरली आहे. तर मुंबईकडून ट्रेंट बोल्टकडे नवा चेंडू होता. बोल्टने षटकातील चौथ्या चेंडूवर सुनील नरेनला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह केकेआरच्या संघाने पहिल्या षटकात १ धाव घेत १ विकेट मिळवली.
मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विल जॅक्स आणि फिरकीपटू विघ्नेश पुथूर परतले आहेत. तर अश्वनी कुमार या वेगवान गोलंदाजाला मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला उतरणार आहे.
रायन रिकेल्टन, विल जॅक्स (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर
केकेआरने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या घरच्या मैदानावर प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. सुनील नरेन संघात परतला असून मोईन अली संघाबाहेर झाला आहे.
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
मुंबई इंडियन्स वि. केकेआर सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. मुंबई संघाकडून नवा खेळाडू या मैदानावर पदार्पण करणार आहे.
दुखापतीतून सावरलेला सुनील नरिन या लढतीत खेळण्याची चिन्हं
दुखापतीतून सावरलेला सुनील नरिन या लढतीत खेळण्याची चिन्हं आहेत. नरिनच्या अनुपस्थितीत मोईन अलीने चांगली कामगिरी केली होती, ते दोघेही अंतिम अकरात असू शकतात. आंद्रे रसेलच्या बॅटचा तडाखा अद्याप दिसलेला नाही. अंगक्रिश रघुवंशीला घरच्या मैदानावर खणखणीत खेळी साकारण्याची संधी आहे. वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा हे कोलकातासाठी महत्त्वाचे शिलेदार आहेत.
वेंकटेशकडून वानखेडेवर आणखी एक दिमाखदार खेळी करणार?
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात खेळत आहे. रहाणे आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे पक्के मुंबईकर आहेत. वानखेडेच्या खेळपट्टीची त्यांना पुरेपूर माहिती आहे. २३.७५ कोटी रुपये खर्चून कोलकाताने वेंकटेश अय्यरला ताफ्यात समाविष्ट केलं. मुंबईचं मैदान वेंकटेशसाठी किमयागार आहे. वेंकटेशकडून वानखेडेवर आणखी एक दिमाखदार खेळी करावी अशी संघाची अपेक्षा आहे. क्विंटन डी कॉक पूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यामुळे त्याला परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे.
कसा आहे मुंबईचा संघ?
मुंबईचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर
विघ्नेश पुत्तूरला या सामन्यात संधी मिळणार का?
मुंबईचा राजा रोहित शर्माकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रायल रिकलटनने फलंदाजीत छाप उमटवलेली नाही. मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची कामगिरी महत्त्वपूर्ण असेल. हार्दिक पंड्याला फलंदाजीतही योगदान द्यावं लागेल. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर यांना विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या बळकट कराव्या लागतील. मुंबईच्या छोट्या मैदानावर मिचेल सँटनर कशी गोलंदाजी करतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सत्यनारायण राजूसाठी ही लढत आव्हानात्मक असेल. विघ्नेश पुत्तूरला या सामन्यात संधी मिळणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
वानखेडेवर वाजणार का मुंबईचा डंका?
पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली आहे. चेन्नई आणि गुजरातविरुद्ध मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवातून बोध घेत घरच्या मैदानावर नव्याने सुरुवात करण्याची संधी मुंबईकडे आहे.
(फोटो-संग्रहित छायाचित्र)