MS Dhoni IPL Runs For CSK: आरसीबीच्या संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा ५० धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात सीएसकेची फलंदाजी फळी फेल ठरली. पण चेपॉकच्या मैदानावर धोनीची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची इच्छा मात्र या सामन्यात पूर्ण झाली. धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि ३० धावा करत नाबाद परतला. यादरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मोठी कामगिरी केली आहे.
चेपॉक स्टेडियमवर आरसीबीकडून चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवला पण हा विजय त्याच्यासाठी खास होता, कारण २००८ नंतर प्रथमच बेंगळुरूने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. सीएसकेसाठी हा नक्कीच एक मोठा झटका असणार आहे.
मात्र, या सामन्यात चेन्नईचे चाहते वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहतात तो पाहायला मिळाला. सीएसकेने झटपट विकेट गमावल्यामुळे धोनी या सामन्यात फलंदाजीला उतरला. मुंबई विरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात संघाचा माजी कर्णधार धोनी फलंदाजीला आला होता पण त्याला फक्त २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यात धोनी बराच वेळ मैदानावर खेळताना दिसला. इतकंच नव्हे तर त्याने अखेरच्या षटकात २ षटकार आणि एक चौकारही लगावला.
यासह धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. अखेरच्या षटकात मारलेल्या षटकाराने धोनीने चेन्नईचा सर्वात यशस्वी फलंदाज सुरेश रैनाचा विक्रम मोडीत काढला. सुरेश रैनाने १७१ डावात ४६८७ धावा केल्या होत्या पण धोनीने २०४ डावात ४६९५ धावा करत हा विक्रम मोडला. पण नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. धोनी मैदानावर येईपर्यंत सीएसकेच्या हातून सामना निसटला होता.
As the saying goes,
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2025
Thala Thala Dhaan! ✨ #CSKvRCB #WhistlePodu #Yellove?? pic.twitter.com/53pG2YCKbc
आरसीबीविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली होती. राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर दीपक हुडालाही विशेष कामगिरी करता आली नाही. ९९ धावांत ७ विकेट्स गमावल्याने चेन्नईचा संघ अडचणीत आला होता आणि त्यांचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी क्रीझवर आला. त्याने सुरुवातीला संथ फलंदाजी करत शेवटच्या षटकात कृणाल पांड्याविरुद्ध फटकेबाजी केली खरी, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.