चेन्नई : महेंद्रसिंह धोनीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांचे धोनीवर प्रचंड प्रेम होते. मात्र, आता हे चाहते जणू ‘धोनीवेडे’ झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे चाहते आपल्याच संघाचा फलंदाज बाद झाल्यावर मोठा जल्लोष करतात, कारण त्यांना धोनीला पाहायचे असते. अशा प्रकारचे ‘वेड’ खेळाला मारक आहे, असे परखड मत माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने मांडले.
धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडले असले, तरी त्याला मिळणारा पाठिंबा किंचितही कमी झालेला नाही. पुढे जाऊन याचा चेन्नई संघाला मोठा फटका बसू शकेल, असे रायडूला वाटते. ‘‘हे चित्र योग्य नाही. एकाच व्यक्तीभोवती चाहत्यांचा पाठिंबा असाच फिरत राहिला, तर ते चेन्नई संघासाठी धोकादायक आहे. येथे प्रथम धोनीला पाठिंबा मिळतो आणि मग चेन्नई सुपर किंग्जचे नाव येते. चाहते संघाचे आहेत की धोनीचे असा प्रश्न पडतो,’’ असे रायडू म्हणाला. रायडू यापूर्वी धोनीसह चेन्नई संघाकडून खेळला आहे.
‘‘धोनीने आपल्या कामगिरीने हे प्रेम मिळवले आहे यात शंका नाही. मात्र, एकाच खेळाडूला इतका पाठिंबा मिळत असेल, तर ते खेळाला निश्चित मारक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे घडत आहे. अनेक खेळाडू उघडपणे बोलत नसले, तरी त्यांना आतून ते जाणवले आहे. धोनीला खेळण्यासाठी १० ते १५ चेंडूच मिळाले, तर चाहते चिडतात ही आजची स्थिती आहे. त्यांना फक्त धोनीलाच खेळताना पाहायचे आहे. चेन्नई सुपर किंग्जचा एखादा फलंदाज मैदानावर येत असतो, तेव्हा ‘तू बाहेर जा, धोनीला पाठव’ असे प्रेक्षकांकडून सांगितले जाते. हे खूप विचित्र आहे आणि खेळासाठी चांगले नाही,’’ असेही रायडूने नमूद केले.
‘‘चाहत्यांनी रवींद्र जडेजासारख्या संघातील अन्य सदस्यांनाही पाठिंबा द्यायला हवा. चेन्नई फ्रँचायझीनेही प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दुसरा खेळाडू समोर आणलाच नाही. आता त्यांनी चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे,’’ असे रायडू म्हणाला.
खेळाडूंच्या या लोकप्रियतेचे खूप आश्चर्य वाटते. यात बदल झाला पाहिजे असे माझे म्हणणे नाही, पण थोडे संतुलन असायला हवे. विशेषत: क्रिकेटसारख्या सांघिक खेळात अन्य खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची असते. आता या सगळ्यावर धोनीच मार्ग काढू शकतो. – अंबाती रायडू