अहमदाबाद : सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ विजयपथावर येण्यासाठी उत्सुक असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये आज, शनिवारी होणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत कर्णधार हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाने त्यांना बळ मिळणार आहे.
गतहंगामात मुंबईच्या संघाने तीन वेळा षटकांची गती धिमी राखल्याने हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, आता माजी संघ गुजरातविरुद्ध तो मुंबई संघात परतेल. अष्टपैलू हार्दिकमुळे मुंबईचा संघ अधिक संतुलित होणे अपेक्षित आहे.
मुंबई आणि गुजरात हे दोनही संघ हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे सलग १३व्या हंगामात सलामीची लढत गमाविण्याची नामुष्की मुंबई संघावर ओढवली. आता कर्णधाराच्या पुनरागमनानंतर कामगिरी उंचावण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, गुजरातला पंजाब किंग्जविरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. गुजरातचे गोलंदाज कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आता प्रयत्नशील असतील.
हार्दिकच्या उपलब्धतेमुळे मुंबईच्या संघाला बळकटी मिळणार असली, तरी सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माची लय हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीच्या लढतीत रोहितला खातेही उघडता आले नाही.
● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.