IPL 2025 Nicholas Pooran Six Hit Fan: लखनौ सुपर जायंट्स संघाचा विस्फोटक फलंदाज निकोसल पुरन कमालीच्या फॉर्मात आहे. निकोलस पुरन त्याच्या गगनचुंबी षटकारांसाठी ओळखला जातो. पुरन या हंगामात लखनौ संघासाठी एक मॅचविनर खेळाडू ठरत आहे. शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने एक उत्कृष्ट खेळी केली. पण या सामन्यात पुरनच्या फटकेबाजीमुळे एक चाहता रक्तबंबाळ झाला.
लखनौच्या मैदानावर झालेल्या सामन्याक स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याला त्याच्या एका षटकारामुळे गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या चाहत्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. निकोलस पूरनने एकाना स्टेडियमवर गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी केली. यादरम्यान, त्याने १७९.४१ च्या स्ट्राईक रेटने ३४ चेंडूत ६१ धावा केल्या. ज्यामुळे लखनौने १८१ धावांचे लक्ष्य केवळ ४ गडी गमावून पूर्ण केले.
निकोलस पूरनने त्याच्या ६१ धावांच्या खेळीदरम्यान त्याने फक्त १ चौकार लगावला, तर तब्बल ७ षटकार लगावले आहेत. पण यातील एक षटकार स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यासाठी धोकादायक ठरला. निकोलस पूरनचा षटकारासाठी गेलेला चेंडू थेट स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्याच्या डोक्यावर जाऊन आदळला. चेंडू आदळल्यानंतर चाहत्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते.
या घटनेनंतर, चाहत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण या चाहत्याच्या धाडसाचे पण कौतुक केले जात आहे, कारण उपचारानंतर तो स्टेडियममध्ये परतला आणि लखनौच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. या चाहत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये, उपचारानंतर या चाहत्याच्या डोक्यावर पट्टी बांधलेली आहे.
One of Nicholas Pooran's sixes hit a spectator in the head.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2025
– The guy wanted to watch the match again after getting the treatment. pic.twitter.com/LFHTCshg9j
निकोलस पुरन या सामन्यात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुझे आहे. तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात लखनौ सुपर जायंट्ससाठी त्याच्या बॅटने महत्त्वाचे योगदान देत आहे. या हंगामात आतापर्यंत त्याने ६ सामन्यांमध्ये ६९.८० च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतकं देखील समाविष्ट आहेत. या हंगामात त्याने आतापर्यंत २६ चौकार आणि ३१ षटकार लगावले आहेत. यावेळी तो षटकारांच्या बाबतीतही आघाडीवर आहे. याशिवाय, त्याने एका हंगामात इतकं अर्धशतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.