IPL 2025 RCB vs KKR Weather Report: आयपीएल २०२५ चा थरार आजपासून म्हणजेच २२ मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या सामन्यात कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानात आमनेसामने उभे ठाकणार आहेत. पण बहुचर्चित अशा या लढतीवर पावसाचं सावट आहे.

शुक्रवारी दोन्ही संघ सरावासाठी मैदानात दाखल झाले. मात्र पाऊस आल्याने संघांना सराव गुंडाळावा लागला. पावसाचा जोर कायम राहिल्याने संघांनी इन्डोअर सराव केला. २००८ नंतर पहिल्यांदाच हंगामाची सलामीची लढत या दोन संघात होत आहे. आयपीएलचा नारळ फुटलेल्या त्या लढतीत ब्रेंडन मॅक्युलमने १५८ धावांची अद्भुत आणि अविश्वसनीय खेळी केली होती. मॅक्युलमच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर कोलकाताने बंगळुरूचा धुव्वा उडवला होता. त्या सामन्याने आयपीएलची रुजवात झाली आणि बघता बघता त्याचा प्रचंड मोठा ब्रँड झाला.

अॅक्युवेदर.कॉमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पाऊस पडू शकतो. ढगाळ वातावरण राहील. दुपारी सूर्यप्रकाश असेल असं म्हटलं आहे. भारतीय हवामान खात्याने शनिवारी गडगडाटी वादळासह पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या महासागरात हवेचा पट्टा तयार झाल्याने पाऊस पडण्याची चिन्हं आहेत.

पाऊस हलका असला तरी पश्चिम बंगाल, सिक्कीम भागात गडगडाटी वादळवारे असतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

कोलकाताने गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाला जेतेपदाला गवसणी घातली होती. लिलावाआधी कोलकाताने आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग आणि रमणदीप सिंग यांना रिटेन करण्याचा निर्णय घेतला. जेतेपद विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला ताफ्यात कायम न राखण्याचा निर्णय कोलकाता संघव्यवस्थापनाने घेतला. मला विजयाचं म्हणावं असं श्रेय मिळालं नाही असं श्रेयसने सांगितलं होतं. लिलावात कोलकाताने २३.७५ कोटी रुपये खर्चून वेंकटेश अय्यरला संघात समाविष्ट केलं. तोच संघाचा कर्णधार असेल अशी चिन्हं होती. मात्र कोलकाताने अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात अनसोल्ड गेलेल्या अनुभवी अजिंक्यला दुसऱ्या टप्प्यात कोलकाताने संघात सहभागी करून घेतलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळलेल्या रहाणेने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईला रणजीसह असंख्य स्पर्धांची जेतेपदं मिळवून दिली आहेत.

क्विंटन डी कॉक, रोव्हमन पॉवेल, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, अँनरिक नॉर्किया या नव्या शिलेदारांकडून कोलकाताला मोठ्या अपेक्षा आहेत. दुखापतीमुळे उमरान मलिक संपूर्ण हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने कोलकाताने चेतन सकारियाला संघात घेतलं आहे.

दुसरीकडे १८व्या वर्षी तरी जेतेपद पटकवावं यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्रयत्नशील आहे. बंगळुरूने नेतृत्वाची धुरा रजत पाटीदारकडे सोपवली आहे. विराट कोहली संघाचा आधारस्तंभ असेल. टीम डेव्हिड, जेकब बेथेल, लायम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट यांच्याकडून बंगळुरूला धुवाधार खेळीची अपेक्षा आहे. भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी शिलेदार बंगळुरूने ताफ्यात आणला आहे. भुवीला साथ देण्यासाठी जोश हेझलवूड आणि लुंगी एन्गिडी असतील. विदर्भवीर जितेश शर्मा बंगळुरूचा एक्स फॅक्टर ठरू शकतो. कृणाल पंड्या लखनौकडून बंगळुरूच्या ताफ्यात दाखल झाला आहे. कृणालचा अष्टपैलू खेळ बंगळुरूसाठी उपयुक्त ठरू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड

Story img Loader