IPL 2025 Points Table Updates: IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सर्व १० संघांचे यंदाच्या आयपीएलमध्ये १-१ सामने पार पडले आहेत आणि गुणतालिकेतही याचे जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. काही संघांनी नेत्रदीपक विजय नोंदवले तर काही संघांना त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वात मोठा झटका राजस्थान रॉयल्स संघाला लागला आहे, कारण पहिल्याच सामन्यानंतर संघ अखेरच्या स्थानी आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने राजस्थान रॉयल्स विरुद्ध २८६ धावा करून मोठा विक्रमच केला नाही तर विजयही मिळवला. या विजयासह संघ +२.२०० च्या प्रभावी नेट रन रेटसह (NRR) गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. ही या मोसमातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या होती. तर आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.

विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या दमदार खेळीच्या बळावर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ने कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) पराभव केला आणि +२.१३७ नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत सामन्यात सहज विजय मिळवत विजयाने मोहिमेला सुरूवात केली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने (PBKS) चांगली सुरुवात केली. त्यांनी गुजरात टायटन्सविरुद्ध २४३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार श्रेयस अय्यरने ४२ चेंडूत ९७ धावांची खेळी करत पंजाबला विजयापर्यंत नेले. पंजाबने हा सामना ११ धावांनी जिंकला आणि +०.५५० च्या नेट रन रेटसह तिसरे स्थान गाठले.

आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ कितव्या स्थानी?

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव करून चेपॉकचा गड राखला. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्या खेळीने सीएसकेला विजय मिळवून दिला. तर, दिल्ली कॅपिटल्सने (DC) लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या षटकात थरारक विजय नोंदवला.

IPL 2025 Points Table After 1st Match of 10 Teams
आयपीएल २०२५ च्या ५ सामन्यांनंतर गुणतालिका – (फोटो-आयपीएल)

राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानला सनरायझर्स हैदराबादने ४४ धावांनी पराभूत केले, तर कोलकाताला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवांमुळे दोन्ही संघांच्या नेट रन रेटमध्येही मोठी घसरण झाली आणि सध्या दोन्ही संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत.