IPL 2025 Points Table Update After KKR vs PBKS Match: कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला गेलेला पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. पंजाबने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने एक षटक फलंदाजी केली आणि त्यानंतर वादळ आणि पाऊस आला. पाऊस सुरूच असल्याने काही वेळाने सामना रद्द करण्यात आला. पण याचा मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे.

कोलकातामध्ये दुसऱ्या डावातील दुसरं षटक सुरू होण्यापूर्वी अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. वादळ इतकं जोरदार होतं की ग्राउंड स्टाफला कव्हर मैदानावर व्यवस्थित ठेवताही आले नाहीत. यादरम्यान काही कव्हरही फाटले. सामना थांबवण्यात आला तेव्हा सुनील नारायण चार धावांसह आणि रहमानउल्लाह गुरबाज एका धावेसह खेळत होते.

कोलकातामधील सामना अनिर्णीत राहिल्याने पंजाब आणि कोलकाता यांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यासह, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचे नऊ सामन्यांत ११ गुण झाले आहेत. त्यांचा नेट रन रेट ०.१७७ होता आणि मुंबई इंडियन्सला मागे टाकत त्यांनी चौथ स्थान गाठलं आहे.

तर केकेआरलाही एक गुण मिळाला. यामुळे त्याेंचे नऊ सामन्यांमधील एकूण सात गुण झाले आहेत. संघ पूर्वीप्रमाणेच सातव्या स्थानावर आहे. सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता संघाचे नुकसान झाले आहे. आता प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील. तर पंजाबचे फारसे नुकसान झाले नाही. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्यांदाच पावसामुळे सामना रद्द झाला.

मुंबई इंडियन्स टॉप-४ मधून बाहेर पडल्याने संघाला धक्का बसला आहे. पण मुंबईचा पुढील सामना उद्या म्हणजेच २७ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्सला स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. गुणतालिकेतील पहिले ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात.

पंजाब-केकेआऱ सामन्यानंतर आयपीएल २०२५ची गुणतालिका

प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या सलामीवीरांनी शानदार फलंदाजी केली. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ चेंडूत १२० धावांची भागीदारी केली. यासह पंजाब संघ २०० धावसंख्या गाठू शकला. प्रभसिमरनने ४९ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार-षटाकारांसह ८३ धावा तर प्रियांशने ३५ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा केल्या.

१४ व्या षटकानंतर पंजाबचा संघ १ बाद १५८ धावांच्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता पण केकेआरच्या गोलंदाजांनी शेवटच्या सहा षटकांत फक्त ४३ धावांत ३ विकेट घेत त्यांना २०१ धावांवर रोखले. पंजाबकडून, सलामीवीरांव्यतिरिक्त, कर्णधार श्रेयस अय्यरने १६ चेंडूत नाबाद २५ धावांचे योगदान दिले आणि जोश इंगलिसने ६ चेंडूत नाबाद ११ धावांचे योगदान दिले.