IPL 2025 Rajasthan Royals Captain: आयपीएल २०२५ चा रोमांच येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट असे १० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या खेम्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना धक्का देणारी आहे. संजू सॅमसन काही सामने राजस्थानचे नेतृत्त्व करताना दिसणार नाही. त्याच्या जागी युवा खेळाडूची वर्णी लागली आहे.
आयपीएल २०२५ मधील राजस्थान रॉयल्सचा सलामीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध हैदराबादच्या घरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात संजू सॅमसन कर्णधार म्हणून खेळताना दिसणार नाही. संघाचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. यामुळे राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेत कर्णधार बदलला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने स्टार अष्टपैलू खेळाडू रियान परागकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. सुरूवातीचे तीन सामने रियान परागच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानचा संघ खेळताना दिसणार आहे. संजू सॅमसन आयपीएलपूर्वी राजस्थानच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. पण दुखापतीमुळे तो यष्टीरक्षण करताना दिसणार नाही.
गेल्या काही आठवड्यांपासून बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला संजू सॅमसन अद्याप यातून पूर्णपणे सावरलेला नाही. सॅमसनला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फलंदाजीची परवानगी मिळाली असली तरी त्याला अद्याप यष्टीरक्षणासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल, तर संजू सॅमसन फलंदाज म्हणून खेळत राहील, असे फ्रेंचायझीने गुरुवारी, २० मार्च रोजी जाहीर केले. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर केवळ संजूच कर्णधार म्हणून पुनरागमन करेल.
संजू सॅमसनने स्वत: संपूर्ण संघासमोर रियान परागकडे कर्णधारपद देण्याची घोषणा केली. संजू सॅमसनला गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याला फलंदाजीसाठी तंदुरुस्त घोषित केल्यानंतर तो नुकताच राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये परतला. यष्टिरक्षणासाठी तो अजूनही बीसीसीआयकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याची वाट पाहत आहे.
रियान पराग पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असेल. त्याने यापूर्वी कधीही आयपीएलमधील कोणत्याही संघाची कमान सांभाळली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स २३ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध, २६ मार्चला गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध आणि ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध खेळताना दिसेल.