Rohit Sharma Sixes Record In IPL 2025: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. रोहितने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाकडून पदार्पण केलं. त्यानंतर त्याने २०११ मध्ये मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला. आपल्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने या संघाला पाच वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. यादरम्यान त्याच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्ड्सची नोंददेखील झाली. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने खास शतक पूर्ण केलं आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला. धावांचा पाठलाग करताना त्याने १६ चेंडूंचा सामना करत २६ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३ षटकार खेचले. यासह रोहितने वानखेडे स्टेडियमवर फलंदाजी करताना १०० षटकार पूर्ण केले आहेत.
रोहित शर्माचं वानखेडेवर खास शतक
रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर फलंदाजी करताना १०० षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला असा कारनामा करता आलेला नाही. यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच मैदानावर १०० षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे, यापूर्वी हा रेकॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांच्या नावावर होता. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर फलंदाजी करताना विराट कोहलीने १३० षटकार खेचले आहेत, तर माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावे १२७ षटकार मारण्याची नोंद आहे. याच संघातील आणखी एक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने या मैदानावर खेळताना ११८ षटकार मारले होते.
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने या स्पर्धेत षटकारांचा पाऊस पाडला आहे. रोहितच्या नावे या संपूर्ण स्पर्धेत २८६ षटकार मारण्याची नोंद आहे. या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याने ३५७ षटकार मारले होते. मुंबईकडून खेळण्याआधी रोहित डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळायचा. या संघाकडून खेळताना त्याने ५१ षटकार खेचले होते.