Vaibhav Suryavanshi Fake X Account : वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने नवा इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवने काल दुसऱ्या सामन्यात ३५ चेंडूत शानदार शतक ठोकून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. धडाकेबाज कामगिरीमुळे तो आयपीएलमध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान भारतीय खेळाडू बनला आहे. त्याच्या जबरदस्त फलंदाजीनंतर आता क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह यांनीही कौतुक केलं आहे.

मात्र, एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या बनावट एक्स प्रोफाइलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोमवारी वैभव सूर्यवंशीच्या दमदार खेळीचा गैरफायदा घेत एक्सवर वैभव सूर्यवंशी नावाच्या बनावट प्रोफाइल तयार करून @VaibhavOfficia हे हँडल नेम वापरून भरपूर फॉलोअर्स आणि engagement मिळवली.

इतकंच नाही तर प्रोफाइलच्या डिस्ल्पे पिक्चरवर राजस्थान रॉयल्सच्या युनिफॉर्ममधील वैभवचा फोटोही वापरला आहे; तर इंडिया अंडर १९ मध्ये खेळतानाचा त्याचा एक फोटो कव्हर फोटो म्हणून ठेवला आहे.

सचिन तेंडलकरच्या ट्विटला वैभव सूर्यवंशीच्या बनावट अकाउंटद्वारे रिप्लाय (Vaibhav Suryavanshi’s fake X account reply to Sachin Tendulkar)

धक्कादायक बाब म्हणजे वैभव सूर्यवंशीच्या याच बनावट एक्स अकाउंटवरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या कौतुकास्पद ट्विटला उत्तर देण्यात आलं आहे, त्यामुळे अनेक चर्चा रंगत आहेत. इतकचं नाही तर राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केलेले ट्विट्सही या अकाउंटवरून रिपोस्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या या बनावट एक्स अकाउंटवरून सचिन तेंडुलकरच्या कौतुकाला उत्तर देत म्हटले आहे की, “खूप खूप धन्यवाद सर, तुमच्यासारख्या महान व्यक्तीकडून माझी प्रशंसा होणं हे माझ्यासाठी स्वप्न होते, तुम्ही केलेले कौतुक शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”

वैभव सूर्यवंशीच्या बनावट अकाउंटवर एक्सची कारवाई

दरम्यान, याच ट्विटने काही वेळात अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. अनेक एक्स युजर्सचा असा समज झाला आहे की, वैभव सूर्यवंशीचे हे अधिकृत एक्स अकाउंट आहे, त्यामुळे अनेक एक्स युजर्स अकाउंटवरील पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ४००० हून अधिक लोकांनी या अकाउंटवरील पोस्ट रिपोस्ट केल्या आहेत. यानंतर एक्सने कारवाई करत वैभव सूर्यवंशीचे हे अकाउंट बनावट असल्याचे जाहीर केलं आहे.

वैभव सूर्यवंशीचे ‘ते’ अकाउंट बनावट असण्याची एक्सने सांगितली तीन कारणं

एक्सने वैभव सूर्यवंशी नावाने सुरू असलेले हे अकाउंट बनावट असण्याची तीन कारणं सांगितली आहेत. १) राजस्थान रॉयल्स हे अकाउंट फॉलो केलेले नाही. ( हा संघ एक्सवर त्यांच्या सर्व खेळाडूंना फॉलो करतो.) २) अशा अकाउंटवर ‘Officia’ चा वापर केला जातो, पण प्रोफेशन अकाउंट ऑफिशिया वापरणं टाळतात. ३) सर्व ट्विट्स आणि रिप्लाय २८ एप्रिल २०२५ चेच आहेत, याचा अर्थ कदाचित हे अकाउंट इंगेजमेंट वाढवण्यासाठी तयार केलं आहे.

दरम्यान, काही तासांनी एक्सने हे अकाउंट सस्पेंड केले. परंतु, युजरने पळवाट काढत त्याच क्रेडेन्शियल्सचा वापर करून @Vaibhavsooryava या आयडीसह नवीन प्रोफाइल तयार केले. पण, त्यावर तेंडुलकरच्या ट्विटला दिलेले उत्तर नाही, परंतु दुसरी पोस्ट तशीच राहिली आहे; त्यामुळे एक्स आता या बनावट युजरच्या मूळ प्रोफाइलवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.