IPL 2025, RR vs CSK Highlights: राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत शिस्तबद्ध खेळ करत चेन्नई सुपर किंग्सला सहा धावांनी नमवलं. नितीश राणाच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने १८२ धावांची मजल मारली. ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. रवींद्र जडेजा-महेंद्रसिंग धोनी ही अनुभवी जोडी चेन्नईला जिंकून देणार असं चित्र असताना संदीप शर्माने शेवटच्या षटकात धोनीला बाद केलं. संदीपने शेवटच्या षटकात २० धावांचा यशस्वी बचाव केला.
Rajasthan Royals vs Chennai Super Kings Highlights : राजस्थान रॉयल्ससमोर घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स संघाचं आव्हान असणार आहे. राजस्थान संघ पहिला विजय मिळवण्यासाठी सामन्यात उतरणार आहे.
संदीप शर्माने करून दाखवलं; राजस्थानचा चेन्नईवर ६ धावांनी थरारक विजय
शेवटच्या षटकात २० धावांचा बचाव करण्याची जबाबदारी राजस्थानने संदीप शर्माकडे सोपवली. समोर महेंद्रसिंग धोनी. संदीप शर्माने सगळा अनुभव पणाला लावत धोनीला बाद केलं आणि सामन्याचं पारडं राजस्थानच्या दिशेने फिरवलं. धोनी बाद झाल्यानंतरही चेन्नईच्या फलंदाजांनी प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले.
शिमोरन हेटमायरचा चित्तथरारक झेल; धोनी बाद
शिमोरन हेटमायरने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल टिपला. धोनीने ११ चेंडूत १६ धावा केल्या.
हासारंगाचा भन्नाट स्पेल
वानिंदू हासारंगाने ४ षटकात ३५ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या.
ऋतुराजचा षटकार आणि पुढच्याच चेंडूवर बाद
ऋतुराज गायकवाडने वानिंदू हासारंगाला खणखणीत षटकार लगावला मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. ऋतुराजने ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक
एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही ऋतुराज गायकवाडने संयमाने खेळ करत अर्धशतक पूर्ण केलं.
विजय शंकरही माघारी
वानिंदू हासारंगाच्या फिरकीसमोर विजय शंकर निष्प्रभ ठरला.
रियान परागचा अफलातून झेल; शिवम दुबेची खेळी संपुष्टात
वानिंदू हासारंगाच्या ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकावण्याचा शिवम दुबेचा प्रयत्न रियान परागच्या अफलातून झेलने हाणून पाडला. चेंडू जमिनीला स्पर्श होण्याआधीच रियान परागने सुरेख डाईव्ह लगावत झेल पूर्ण केला. दुबेने १८ धावा केल्या.
हासारंगाने दूर केला त्रिपाठीचा अडथळा
वानिंदू हासारंगाने स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर राहुल त्रिपाठीला बाद केलं. हासारंगाचा चेंडू पूल करण्याचा त्रिपाठीचा प्रयत्न हेटमायरच्या हातात गेला. त्याने २३ धावा केल्या.
ऋतुराज-त्रिपाठीची जमली जोडी
महाराष्ट्राकडून खेळणारे ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांनी पॉवरप्लेच्या षटकांचा फायदा उठवत फटकेबाजी केली. चेन्नईने ६ षटकात ४२ धावा केल्या आहेत.
जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात विकेट मिळवत राजस्थानला शानदार सुरूवात करून दिली आहे. आर्चरचा पहिला चेंडू रचिनने डिफेंड केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर रचिन गडबडला आणि चेंडू थेट विकेटकिपर ध्रुव जुरेलच्या हातात गेले. चौथा चेंडूही आर्चरने सारखाच टाकला, पण यावेळेला चेंडू बॅटची कड घेत सारखाच ध्रुवच्या हातात गेला. यासह राजस्थानला पहिली विकेट मिळाली.
नितीश राणाच्या झंझावातानंतर राजस्थानची शरणागती; चेन्नईसमोर १८३ धावांचं आव्हान
नितीश राणाच्या ३६ चेंडूत ८१ धावांच्या तडाखेबंद खेळीनंतर राजस्थानने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. एकाक्षणी राजस्थान २२५ धावांचा टप्पा ओलांडेल असं चित्र होतं मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी धावगतीला वेसण घालताचानाच विकेट्सही पटकावल्या. राजस्थानने १८२ धावांची मजल मारली.
राजस्थानची पडझड सुरूच
नितीश राणाच्या विकेटनंतर राजस्थानच्या डावाची लयच हरपली. नियमित अंतरात त्यांनी विकेट्स गमावल्या.
कर्णधार रियान पराग तंबूत
मथिशा पथिराणाच्या भेदक यॉर्करवर राजस्थानचा कर्णधार रियान पराग त्रिफळाचीत झाला. आधीच्या उसळत्या चेंडूवर रियानच्या कोपराला दुखापत झाली होती. उपचारानंतर पुढच्याच चेंडूवर यॉर्करसमोर तो निरुत्तर ठरला. परागने ३७ धावांची खेळी केली.
शिमोरन हेटमायरला जीवदान
मथिशा पथिराणाच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारायचा शिमोरन हेटमायरचा प्रयत्न हवेत उंच उडाला. जेमी ओव्हर्टन झेल टिपणार असं वाटत असतानाच त्याच्या हातून चेंडू निसटला. चेन्नईला हे जीवदान देणं महागात पडू शकतं.
विजय शंकरचा अविश्वसनीय झेल
चेन्नई सुपर किंग्ससाठी घरवापसी करणाऱ्या विजय शंकरने अफलातून झेल टिपत वानिंदू हासारंगाला माघारी धाडलं. नितीश राणाच्या खेळीने सैरभैर झालेल्या चेन्नईने सामन्यात पुनरागमन केलं आहे. बंगळुरूविरुद्ध सर्वसाधारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या चेन्नईने या लढतीत अमूलाग्र बदल केला आहे.
ध्रुव जुरेलही माघारी
नितीश राणाच्या झंझावातानंतर चेन्नईने राजस्थानच्या धावगतीला वेसण घालत विकेट्सही पटकावल्या आहेत.
नितीश राणाची झंझावाती खेळी संपुष्टात
रवीचंद्रन अश्विनच्या फसव्या चेंडूवर आणखी एक मोठा फटका खेळायचा नितीश राणाचा प्रयत्न फसला आणि महेंद्रसिंग धोनीने चपळतेने स्टम्पिंग केलं. राणाने ३६ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी केली. त्याने १० चौकार आणि ५ षटकार लगावले.
राजस्थानच्या १० षटकात १०० धावा
नितीश राणाच्या मुक्त फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने १०व्या षटकात शंभरी पार केली आहे.
ब्रेकनंतर चेन्नईला दिलासा; नूरने संजूला दाखवला परतीचा रस्ता
तब्बल १० कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलेल्या नूर अहमदने धोकादायक संजू सॅमसनला बाद करत चेन्नईला सामन्यात परतण्याची संधी दिली. संजूने २० धावा केल्या.
नितीश राणाचं वादळी अर्धशतक; राजस्थानने पॉवरप्लेमध्ये पार केली पंच्याहत्तरी
नितीश राणाच्या अफलातून अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने ६ षटकातच पंच्याहत्तरी पार केली आहे. नितीश राणाने खलील अहमदच्या चेंडूवर चौकार लगावत २१ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार चोपला.
अश्विनच्या पहिल्या षटकात १९ धावांची खैरात
अनुभवी रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची लयलूट करत नितीश राणाने १९ धावा चोपून काढल्या.
नितीश राणा-संजू सॅमसनची आक्रमक सुरुवात
यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतरही संजू सॅमसन आणि नितीश राणा यांनी आक्रमक पवित्र्यानेच खेळ केला. जेमी ओव्हर्टनच्या गोलंदाजीचा समाचार घेत या जोडीने चौकार वसूल केले.
यशस्वी जैस्वालची चौकाराने सुरुवात, झेल देऊन बाद
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने चेन्नईच्या खलील अहमदचं स्वागत चौकाराने केलं. खलीलने टप्पा बदलला. कव्हर ड्राईव्ह मारण्याचा यशस्वीचा प्रयत्न फसला आणि अश्विनने झेल टिपला.
चेन्नईने पारंपरिक विचारांना दिला छेद
चेन्नई सुपर किंग्स पारंपरिक विचारसरणीने चालणारा संघ आहे. खेळाडूंची निवड केल्यावर ते अपयशी ठरले तरी त्यांना संघातून डच्चू दिला जात नाही. तीन दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर चेन्नईने डावपेच बदलले आहेत. राजस्थानविरुद्धच्या लढतीसाठी त्यांनी सॅम करन आणि दीपक हुड्डा यांना संघातून डच्चू दिला आहे. अष्टपैलू जेमी ओव्हर्टन आणि विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे. ५ जेतेपदं नावावर असणाऱ्या चेन्नईचा संघ यंदा अडखळताना दिसत आहे.
RR vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचा संघ
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आरसीबीविरूद्धच्या पराभवानंतर दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दीपक हुडाच्या जागी विजय शंकरला तर सॅम करनच्या जागी जेमी ओव्हरटनला संधी देण्यात आली आहे.
रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मथीशा पाथीराना
राजस्थान रॉयल्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही.
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
RR vs CSK Live: नाणेफेक
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्याची नाणेफेक चेन्नईने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. चेन्नईच्या ताफ्यात मोठे बदल झाले आहेत.
रियानच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने पहिले सलग दोन सामने गमावले असून आता त्याच्यावर संघाला विजय मिळवून देण्याचे दडपण आहे. चेन्नईसारख्या बलाढ्य संघाचे समोर आव्हान असताना राजस्थानचा संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
RR vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचा संघ
रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हुडा, सॅम करन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, विजय शंकर, शेख रशीद, जेमी ओव्हरटन, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉन्वे, मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, नॅथन एलिस, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी.
RR vs CSK Live: राजस्थान रॉयल्सचा संघ
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, वानिंदू हसरंगा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश टेकशाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, कुनाल सिंह राठोड, आकाश मधवाल, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.
IPL 2025, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Highlights: राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स