टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणं किंवा शतकाच्या जवळपास पोहोचणं ही काही साधारण गोष्ट नाहीय. पण गेल्या २ दिवसांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये ३ खेळाडूंबाबत सारखाच योगायोग पाहायला मिळाला आहे. टी-२० क्रिकेट जगतात ९७ धावांच्या आकड्याची कमाल पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांत ९७ धावांची हॅट्ट्रिक झाली आहे. ३ फलंदाजांनी नाबाद ९७ धावांची खेळी केली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या फलंदाजांनी ही धावसंख्या केली, त्यांच्या संघाने सामना जिंकला.
९७ ही धावसंख्या फलंदाजांसाठी शुभ आकडा ठरली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या २ दिवसांत ही ९७ धावांची खेळी करणारे फलंदाज ठरले श्रेयस अय्यर, टिम सैफर्ट आणि क्विंटन डि-कॉक. या तिघांनीही नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
श्रेयस अय्यरने सुरू केला ट्रेंड
९७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा शुभारंभ श्रेयस अय्यरने केला. सध्या भारतात आयपीएल २०२५चे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये २५ मार्चला हंगामातील ५वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. यादरम्यान त्यांचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. २८ धावांवर चौथ्या षटकात पंजाबने पहिली विकेट गमावली अन् श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी उतरला.
श्रेयसने २३० च्या स्ट्राईक रेटने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर पंजाब संघाने २४४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आणि अखेर ११ धावांनी सामना जिंकला. अय्यरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
टिम सैफर्टने केली श्रेयसच्या कामगिरीची पुनरावृत्ती
श्रेयस अय्यरच्या या कामगिरीची पुनरावृत्ती न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर टिम सैफर्टने पाकिस्यानविरूद्ध सामन्यात २६ मार्चला केली. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने १२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम सैफर्टने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत शानदार फटकेबाजी केली.
सैफर्टने त्याच्या विस्फोटक खेळीत २५५ च्या स्ट्राईक रेटने फक्त ३८ चेंडूत ६ चौकार आणि १० षटकारांसह ९७ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीसह किवी संघाने अवघ्या १० षटकांत १२९ धावांचे लक्ष्य गाठले आणि सैफर्ट संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला.
क्विंटन डि-कॉकने केली हॅट्रिक
आयपीएल २०२५ च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने नाबाद ९७ धावांची खेळी करत हा ट्रेंड कायम ठेवला. २६ मार्चला गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात त्याने राजस्थानविरुद्ध ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊन नाबाद परतला. त्याच्या खेळीच्या जोरावर केकेआरने १५ चेंडू बाकी ठेवत लक्ष्य गाठले आणि सामनावीरही ठरला.