IPL 2025, SRH vs GT Live Match Updates: गुजरातने जबरदस्त सांघिक खेळाच्या बळावर सनरायझर्स हैदराबादला नमवलं. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर गुजरातने हैदराबादला १५२ धावांतच रोखलं. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि शेरफन रुदरफोर्ड यांच्या शानदार खेळींच्या बळावर गुजरातने ७ विकेट्सनी दिमाखदार विजय साकारला.
IPL 2025, Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Highlights सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
गुजरातचा शानदार विजय; सिराज-वॉशिंग्टन चमकले
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच बालेकिल्ल्यात नमवलं.
अनिकेत वर्माचा अफलातून झेल; वॉशिंग्टन सुंदरचं अर्धशतक एका धावेने हुकलं
गुजरात टायटन्ससाठी पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अनिकेत वर्माने त्याचा शानदार झेल टिपला. वॉशिंग्टनने ५ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ही खेळी सजवली.
गिलचं अर्धशतक पूर्ण
झीशान अन्सारीच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करत शुबमन गिलने अर्धशतक पूर्ण केलं.
गिल-वॉशिंग्टनची जोडी जमली रे
जोस बटलर आणि साई सुदर्शन बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भक्कम भागीदारी रचत गुजरातच्या विजयाचा पाया रचला. कमीत कमी धोका पत्करत या दोघांनी फटकेबाजी केली.
सुदर्शन-बटलर माघारी
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि जोस बटलर हे भरवशाचे शिलेदार माघारी परतले आहेत.
हैदराबाद १५२; मोहम्मद सिराजने पटकावल्या ४ विकेट्स
गुजरात टायटन्सने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादला १५२ धावांतच रोखलं. मोहम्मद सिराजने ४ विकेट्स पटकावल्या. साईकिशोर आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावत त्याला चांगली साथ दिली.
सिराजच्या ४ विकेट्स
मोहम्मद सिराजने अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंग यांना बाद करत हैदराबादच्या डावाला खिंडार पाडलं.
हेनरिच क्लासन, नितीश रेड्डी दोघेही बाद
साई किशोरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांना अडकवलं आहे. क्लासनने २७ तर नितीशने ३१ धावांची खेळी केली. ही जोडी हैदराबादला मोठी धावसंख्या गाठून देणार असं चित्र होतं. मात्र साईकिशोरने सामन्याचं पारडं गुजरातच्या दिशेने फिरवलं.
प्रसिध कृष्णाने इशान किशानला पाठवलं तंबूत
चाचपडत खेळणाऱ्या इशान किशनला प्रसिध कृष्णाने माघारी धाडलं. इशानने १७ धावा केल्या.
हैदराबादने पार केली पन्नाशी
हैदराबादने २ विकेट्सच्या मोबदल्यात अर्धशतक पार केलं आहे. इशान किशान आणि नितीश रेड्डी यांच्यादरम्यान धावताना गोंधळ पाहताना मिळाला.
चांगल्या सुरुवातीनंतर अभिषेक शर्माही माघारी
मोहम्मद सिराजने धोकादायक ठरू शकेल अशा अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेकने १६ चेंडूत १८ धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेड तंबूत
तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ट्रॅव्हिस हेडला मोहम्मद सिराजने तंबूत परतावले. त्याने ८ धावा केल्या.
हैदराबाद संघात हर्षल पटेलऐवजी जयदेव उनाडकत
दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज हर्षल पटेल गुजरातविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकता संधी देण्यात आली आहे.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
वॉशिंग्टन सुंदर करणार गुजरातसाठी पदार्पण
आयपीएलचा हा हंगाम सुरू झाल्यापासून वॉशिंग्टन सुंदरला संधी का मिळत नाही यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. आज अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळतो आहे. सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरला कॅप देण्यात आली. त्यामुळे तो अंतिम अकरात असणार हे स्पष्ट झालं आहे.
हैदराबादच्या मैदानावर धावांची लयलूट होणार?
हैदराबादच्या मैदानावर फलंदाज धावांची टांकसाळ उघडतात. तोच इतिहास कायम राहिला तर रविवारी संध्याकाळी चाहत्यांना चौकार-षटकारांची लयलूट अनुभवता येईल.
कागिसो रबाडा खेळणार का?
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा वैयक्तिक कारणांसाठी मायदेशी परतला आहे. तो रविवारच्या लढतीत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत गुजरातने तीनच विदेशी खेळाडूंना संघात खेळवलं होतं. जोरदार फॉर्मात असणाऱ्या ग्लेन फिलीप्सला संधी मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रबाडाऐवजी गुजरातने भारताचा अनुभवी इशांत शर्मावर विश्वास ठेवला आणि त्याने तो सार्थ ठरवला. रबाडाऐवजी गेराल्ड कुत्सिया या उमद्या वेगवान गोलंदाजांलाही संधी मिळू शकते.
गुजरातला सातत्य गवसलं
शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला विजयात सातत्य राखण्याचा मंत्र गवसला आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर उत्तम फॉर्मात आहेत. दुसरीकडे मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, इशांत शर्मा यांच्यासह साई किशोर विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत आहेत.
सलामीच्या लढतीनंतर हैदराबादची घसरगुंडी
सलामीच्या लढतीत २८२ धावांचा डोंगर उभारून दणदणीत विजय मिळवणाऱ्या हैदराबादची नंतर मात्र चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान, किशन, नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिच क्लासन या पंचकाला कसं रोखायचं हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कळलं आहे. रविवारी घरच्या मैदानावर पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची संधी या पाचही जणांकडे आहे.