IPL 2025 RCB Swastik Chikara Bytes Virat Kohli’s Finger Video: आरसीबीच्या संघाने आयपीएल २०२५ ला दणक्यात सुरूवात केली, पण त्यांना घरच्या मैदानावर पराभवाला सामोर जावं लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या मोसमातील पहिल्याच सामन्यात बंगळुरूला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर संघाचा युवा खेळाडू स्वस्तिक चिकाराच्या वाढदिवसामुळे संघातील वातावरण पराभवानंतरही बदललं. त्याने केक भरवताना विराट कोहलीचं बोटं पकडून ठेवलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

बुधवार २ एप्रिलला संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बेंगळुरूला खराब फलंदाजीचा फटका सहन करावा लागला. गुजरात टायटन्सने १८ षटकांत केवळ २ गडी गमावून १७० धावांचे लक्ष्य सहज गाठले. या पराभवानंतर आरसीबीने संघाच्या कामगिरीवर चर्चा केली आणि संघ टीम हॉटेलमध्ये पोहोचला.

आरसीबीच्या ताफ्यातील युवा खेळाडू स्वस्तिक चिकाराचा जन्मदिवस रात्री १२ वाजता साजरा करण्यात आला. टीम हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे स्वस्तिकच्या नावाचा केक तयार होता. प्रथमच आयपीएलमध्ये आलेल्या उत्तर प्रदेशच्या या युवा फलंदाजाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, कर्णधार रजत पाटीदार आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यासह संपूर्ण संघ उपस्थित होता.

केक कापल्यानंतर या युवा फलंदाजाने सर्वप्रथम विराट कोहलीला केक भरवला आणि यादरम्यान स्वस्तिकने थोडा खोडकरपही केला. कोहलीला केक भरल्यानंतर विराटनेही त्याला केक भरवला, तेव्हा कोहली भरवत असलेला केक खाताना स्वस्तिकने विराटचं बोट दातांमध्ये पकडून ठेवलं. कोहलीला त्याला हाताचं बोट सोडण्यास सांगावे लागले आणि हे ऐकून सगळे हसले. विराट त्याला म्हणाला, अरे भाई माझ्या हाताची बोटं तर सोड… हे ऐकून सर्वच जण हसले.

मग काही वेळाने स्वस्तिकने कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, “विराट भाईची दोन-तीन घड्याळं मला भेट म्हणून द्या.” सर्व खेळाडूंनी त्याला केक भरवत शुभेच्छा देत त्याचा वाढदिवस साजरा केला. स्वस्तिक चिकारा खूपच खोडकर आहे. यापूर्वी त्याने विराट कोहलीच्या बॅगमधून त्याचा परफ्यूम काढला होता आणि त्याचा वास कसा आहे हे पाहत होता. विराटही समोरच बसला होता, पण विराटने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तोदेखील हसत होता.

आरसीबीने या दोन्ही घटनांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला. संघातील वरिष्ठ आणि ज्युनियर खेळाडूंमध्ये चांगले संबंध असल्याचे चाहत्यांनी कौतुक केले. स्वस्तिकला बंगळुरूने मेगा लिलावात ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह खरेदी केले होते. UP T20 लीगमध्ये त्याने ४७ षटकारांच्या मदतीने ४९९ धावा केल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर आरसीबीने त्याच्यावर बाजी मारली. मात्र, त्याला अद्याप आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.