आयपीएल २०२५ मधील पहिला सामना जिंकत सीएसकेने मोहिमेला विजयाने सुरूवात केली. पण त्यानंतर संघाची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईच्या संघाला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभवांच्या हॅटट्रिकसह संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघांनी पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाचा पराभव केला आहे.
इतकंच नव्हे तर चेन्नईला तीन सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असून दोन सामन्यातील पराभव तर संघाने चेपॉकमध्ये पाहिले. दरम्यान संघाची कामगिरी पाहून धोनीबाबत ही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान भारताचा माजी खेळाडूने मोठं वक्तव्य करत संघाच्या कमजोरीबाबत वक्तव्य केलं आहे.
चेन्नई संघाचे सलामीवीर आतापर्यंत मोठी भागीदारी करू शकले नाहीत तर आघाडीच्या फळीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. सीएसकेला धोनीच्या फलंदाजी क्रमामुळेही टीकेचा सामना करावा लागत आहे. दिल्लीविरुद्ध ११व्या षटकात धोनी फलंदाजीला आला पण तरीही संघाचा पराभव झाला. धोनीने दिल्लीविरूद्ध २६ चेंडूत ३० धावांची खेळी केली.
धोनीने स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून वगळावे का या प्रश्नावर जाफर क्रिकइन्फोवर म्हणाला, “होय, धोनी संघाचा कर्णधार नसेल तर त्याची अशी फलंदाजी पाहून थोडं वाईट वाटतंय. अर्थात धोनी संध्या जास्त क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे त्याला मोठी खेळी करणं शक्य नाहीये. तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतो, पण जेव्हा संघाने १० षटकांत पाच विकेट गमावल्या असतील, तेव्हा धोनीकडे फलंदाजीला येण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण त्याच्या नंतर फक्त अश्विन आहे. निदान धोनी आज (दिल्लीविरूद्धच्या सामन्यात) ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला हे चांगलं झालं.”
तो पुढे म्हणाला, “सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे संघाची टॉप ऑर्डर धावा करण्यात अपयशी ठरतेय. लक्ष्याचा पाठलाग करताना ते शर्यतीत आहेत असं वाटतचं नाही. त्यांनी आरसीबीविरूद्ध सामना ४० धावांनी गमावला, हा सामना २५ धावांनी. हा पूर्वीचा सीएसकेचा संघ नाहीये. जेव्हाही सीएसके एखाद्या खेळाडूची निवड करते, तेव्हा तो खेळाडू चांगली कामगिरी करेल अशी संघाला आशा असते. पण यावेळी मात्र असं चित्र दिसलं नाही. मग राहुल त्रिपाठी असो वा दीपक हुडा, जे सध्या फॉर्मात नाहीत.”
वसिम जाफर पुढे म्हणाला, “मला संघाच्या चाहत्यांसाठी वाईट वाटतंय. मोठ्या संख्येने चाहते सामना पाहायला येतात. मी सीएसकेला घरच्या मैदानावर इतकं खराब खेळताना पाहिलं नाही.”