IPL 2025 What Happens if KKR vs RCB Match Got Cancelled Due To Rain: बहुप्रतिक्षित आयपीएलचा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२५ मध्ये सर्वच संघ नव्या खेळाडूंनिशी उतरणार आहेत. या नव्या सीझनपूर्वी आयपीएलचा महालिलाव झाला, ज्यामध्ये सर्वच फ्रँचायझीचे नवे संघ असणार आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएलमधील सलामीचा सामना गतविजेते केकेआर विरूद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. हा सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्स कोलकातामध्ये होणार आहे. पण या सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची चिन्हे आहेत.

आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात पाऊसही हजेरी लावणार आहे. कोलकातामध्ये जोरदार पावसाच्या सरी येणार असल्याची माहिती हवामान विभागाने नोंदवली आहे. याशिवाय कालपासूनच मुसळधार पाऊसदेखील सुरू आहे. अशातच जर आरसीबी वि. केकेआरचा सामना रद्द झाला तर काय होणार, जाणून घेऊया.

कोलकातामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अॅक्युवेदर.कॉमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पाऊस पडू शकतो, तर ढगाळ वातावरण राहील. भारतीय हवामान खात्याने शनिवारी गडगडाटी वादळासह पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या महासागरात हवेचा पट्टा तयार झाल्याने पाऊस पडण्याची चिन्हं आहेत.

कोलकातामधील या पावसामुळे जर सामना रद्द झाला तर काय नियम आहे पाहूया. आयपीएलमधील लीग टप्प्यातील सामन्यांमध्ये कोणताही राखीव दिवस नसतो. मात्र, पावसामुळे सामन्याला उशीर झाल्यास अतिरिक्त वेळ दिला जातो. आयपीएलमधील सामना संध्याकाळी ७.३० वाजता आहे, तर रात्री ११ वाजता सामना संपतो, परंतु पावसामुळे अतिरिक्त एका तासाची वेळ दिली जाते.

T20 क्रिकेटमधील कोणत्याही सामन्याच्या निकालासाठी किमान ५- षटकांचा सामना होणं आवश्यक आहे. त्यामुळे केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याला विलंब होत असेल, तर किमान ५ षटकांच्या खेळाची कट ऑफ वेळ १०.५६ मिनिटे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या वेळेपर्यंत सामना सुरू झाल्यास निकाल लागू शकतो. जर सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना १-१ गुण दिला जाईल.

पावसामुळे शुक्रवारी दोन्ही संघांचा सरावही मैदानावर झाला नसून त्यांना इनडोअर सराव करावा लागला. अशातच आयपीएल २०२५ मधील हा पहिला सामना असल्याने ईडन गार्डन्सवर ओपनिंग सेरेमनी होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीसाठी बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी, गायिका श्रेया घोषाल, रॅपर करन औजला हे उपस्थित राहणार आहेत. पावसाने हजेरी लावल्यास ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रमदेखील उशिराने सुरू होऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतो.

Story img Loader