IPL 2025 Replacement Rule Explainer: आयपीएल २०२५ मध्ये बदली खेळाडूंबाबत एक नियम लागू करण्यात आला आहे. ज्या नियमाचा वापर काही संघांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच केला आहे. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी अनेक संघांमध्ये बदली खेळाडूंचा समावेश केला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी बदली खेळाडू जाहीर केले आहेत. पण हा बदली खेळाडूंचा नियम नेमका काय आहे, सविस्तर जाणून घेऊया.
बदली खेळाडूंबाबत बीसीसीआयने स्पष्ट नियम केले आहेत. एखाद्या खेळाडूला हंगामात दुखापत किंवा आजार झाल्यास, संघ त्याच्या जागी नवीन खेळाडू घेऊ शकतात. हा नियम हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगाम सुरू असताना लागू होतो. २०२५ च्या नियमांनुसार, पहिल्या १२ लीग सामन्यांदरम्यान खेळाडू बदलले जाऊ शकतात. यापूर्वी ही सूट केवळ ७व्या सामन्यापर्यंत उपलब्ध होती.
बदली खेळाडूबाबत दोन अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बदली म्हणून येत असलेल्या खेळाडूचा नोंदणीकृत उपलब्ध खेळाडू पूल (आरएपीपी) मध्ये समावेश करावा. दुसरी अट अशी आहे की बदली खेळाडूची फी ज्या खेळाडूच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आली आहे त्या खेळाडूच्या फीपेक्षा जास्त असू शकत नाही.
स्पर्धेदरम्यान बदली खेळाडूसाठी अटी खालीलप्रमाणे
- कोणत्याही खेळाडूला दुखापत किंवा आजार झाल्यास बदली खेळाडूची घोषणा फ्रँचायझीच्या १२व्या लीग सामन्यादरम्यान किंवा त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
- बीसीसीआयने निश्चित केलेल्या डॉक्टरांनी हे सांगितले पाहिजे की हंगाम संपेपर्यंत खेळाडू दुखापतीतून बरा होऊ शकत नाही.
- जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाला असेल तर तो चालू हंगामात कोणत्याच संघाकडून पुन्हा एकही सामना खेळू शकणार नाही.
IPL 2025 मधील आतापर्यंत बदली केलेले खेळाडू
कोलकाता नाईट रायडर्स
उमरान मलिकच्या जागी (७५ लाख) चेतन सकारिया (७५ लाख)
मुंबई इंडियन्स – अल्लाह गझनफरच्या जागी (४.८ कोटी) मुजीब उर रहमान (२ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद – ब्रायडन कार्सच्या जागी (१ कोटी) वियान मुल्डर (७५ लाख)