धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सचे फलंदाज ढेपाळतात, याचाच प्रत्यय पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पुन्हा पाहावयास मिळाला. त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राजस्थानवर ७१ धावांनी मात करीत आयपीएल स्पर्धेच्या ‘क्वॉलिफायर-२’ लढतीत स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी रांची येथे बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या लढतीमधील विजेता संघ रविवारी मुंबई इंडियन्सशी अंतिम फेरीत लढणार आहे.
अब्राहम डी’व्हिलियर्स व मनदीप सिंग यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतके तसेच त्यांची ११३ धावांची भागीदारी यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्स संघापुढे विजयासाठी १८१ धावांचे आव्हान ठेवता आले होते. शेवटच्या पाच षटकांमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांनी बंगळुरुला ६७ धावा दिल्या. या धावाच राजस्थानसाठी महागात पडल्या. त्यांचे पहिले पाच अनुभवी फलंदाज ८७ धावांत तंबूत परतले. तेथेच त्यांचा पराभव स्पष्ट झाला. अजिंक्य रहाणे (३९ चेंडूंत ४२) याने झुंजार खेळ केला. त्याच्या सहकाऱ्यांनी सपशेल निराशा केली. त्यामुळेच त्यांचा डाव १९ षटकांत १०९ धावांमध्ये आटोपला. राजस्थानकडून एकही फलंदाज अपेक्षेइतकी आक्रमक फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळेच प्रेक्षकांची निराशा झाली.
बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ख्रिस गेल व कर्णधार विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. गेलने चार चौकारांबरोबरच एक षटकार ठोकून झकास प्रारंभ केला. मात्र धवल कुलकर्णीने त्याचा २७ धावांवर त्रिफळा उडवत त्याच्या चाहत्यांची निराशा केली. पुढच्या षटकात स्वत:च्या गोलंदाजीवर धवलने कोहलीला बाद केले. पहिल्या १० षटकांत त्यांना २ बाद ६० धावांवर रोखण्यात राजस्थानने यश मिळविले होते.
मुंबईविरुद्ध नाबाद शतक टोलविणाऱ्या एबी डीव्हिलियर्सने १५ व्या षटकांत अंकित शर्माला दोन षटकार व चौकार ठोकला. या षटकात बंगळुरूला १९ धावा मिळाल्या. ए बीला मनदीप सिंगने चांगली साथ दिली. डी’व्हिलियर्सने ख्रिस मॉरिसला षटकार ठोकून ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तसेच या षटकाराबरोबरच त्याने भागीदारीचे शतकही ६१ चेंडूंत पार केले. ही भागीदारी पूर्ण झाल्यानंतर तो धावबाद झाला. त्याने ३८ चेंडूंत ६६ धावा करताना चार चौकार व चार षटकार अशी आतषबाजी केली. मनदीपने ३३ चेडूंत नाबाद ५४ धावा केल्या. त्यामध्ये त्याने सात चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली.
बंगळुरूची दमदार भरारी
धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सचे फलंदाज ढेपाळतात, याचाच प्रत्यय पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पुन्हा पाहावयास मिळाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2015 at 06:23 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 8 ab mandeep stand rcb deliver