शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता असताना टीम साऊदीने अँजेलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर चौकार खेचला आणि राजस्थानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. या थरारक विजयासह राजस्थानने स्टीव्हन स्मिथच्या नव्या नेतृत्त्वाखाली खेळताना दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे गेल्या हंगामापासून सुरू झालेली पराभवाची मालिका दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्या मैदानावरही खंडित करता आली नाही.
१८५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानतर्फे अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी ३७ धावांची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने सॅमसनला बाद केले. भरवशाचा स्मिथही १० धावा करून तंबूत परतला. थोडय़ाच वेळात करुण नायरला अमित मिश्राने बाद केले. स्टुअर्ट बिन्नी एक धावेवर तंबूत परतला. रहाणेने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने दीपक हुडाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा रहाणेचा प्रयत्न फसला. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली.  हुडाने  २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावांची खेळी साकारली.  जेम्स फॉकनरनेही त्याला चांगली साथ दिली. इम्रान ताहीरने हुडाला बाद केले. ताहीरने हुडापाठोपाठ फॉकनरलाही माघारी धाडले. मात्र ख्रिस मॉरिस आणि टीम साऊदी यांनी अनुभव पणाला लावत संघाचा विजय पक्का केला.
तत्पूर्वी सांघिक प्रयत्नांच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १८४ धावांची मजल मारली. मयांक अगरवाल आणि श्रेयस अय्यर जोडीने ४५ धावांची सलामी दिली. प्रवीण तांबेने अगरवालला बाद करत ही जोडी फोडली.  ़दिल्लीचा कर्णधार जेपी डय़ुमिनीने – अय्यरसह दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावा केल्या. मोठा फटका खेळण्याच्या नादात अय्यरने  विकेट गमावली. त्याने ४० धावा केल्या. डय़ुमिनीने युवराजला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. युवराजने २ षटकारांसह १७ चेंडूत २७ धावा केल्या. मॉरिसनेच त्याला बाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूजने १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावांची वेगवान खेळी केली. डय़ुमिनीने नाबाद ४४ धावा केल्या. दिल्लीने १८४ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सतर्फे ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स  : २० षटकांत ३ बाद १८४ (जेपी डय़ुमिनी ४४, श्रेयस अय्यर ४०, ख्रिस मॉरिस २/३५) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ७ बाद १८६ (दीपक हुडा ५४, अजिंक्य रहाणे ४७, इम्रान ताहीर ४/२८)
सामनावीर : दीपक हुडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा