आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात मुंबईने अखेर बाजी मारत कोलकाता नाइट रायडर्सवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत पाच धावांनी विजय मिळवला. हार्दिक पंडय़ाच्या तुफानी नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने १७१ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना युसूफ पठाणच्या तडफदार खेळीच्या जोरावर सामना अटीतटीचा झाला होता. पण अखेरच्या षटकात किरॉन पोलार्डने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करत मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
मुंबईच्या १७२ धावांचा पाठलाग करताना कोलकाताने संयत सुरुवात केली. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरभजनला षटकार ठोकणारा रॉबिन उथप्पा (२५) त्याच षटकात बाद झाला. याच षटकामध्ये कोलकाताने मनीष पांडेलाही (१) गमावले. त्यानंतर कर्णधार गौतम गंभीरने धावफलक हलता ठेवला. पण जगदीशा सुचितच्या ११व्या षटकात जीवदान मिळालेल्या गंभीरला त्यानंतरच्याच सहाव्या चेंडूवर आपली विकेट गमवावी लागली. त्यानंतर खेळपट्टीवर युसूफ पठाण उभा राहीला. त्याने तडफदार फलंदाजी करत ३७ चेंडूंमध्ये ५ चौकार व दोन षटकारांच्या जोरावर ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली, पण संघाला मात्र तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
तत्पूर्वी, कोलकाताने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईची सुरुवात संयमी झाली. लेंडल सिमन्स (१४) आतापर्यंत दमदार कामगिरी करत असला तरी या सामन्यात मात्र त्याला सूर गवसला नाही. शकिब अल हसनच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक रॉबिन उथप्पाने त्याला यष्टीचीत करण्याची संधी गमावली, पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. मॉर्ने मॉर्केलच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उमेश यादवने पार्थिव पटेलचा (२१) झेल सोडला, त्यावेळी पटेल १६ धावांवर होता. पाचव्या षटकात मात्र पटेल बाद झाला. त्यानंतरच्या मॉर्केलच्या सहाव्या षटकात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मॉर्केलचा तिसरा चेंडू नो बॉल पडला, त्यानंतर मिळालेल्या फ्री-हिटवर सिमन्सने लाँग ऑनला षटकार खेचला, पण त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू टाकत मॉर्केलने सिमन्सला माघारी धाडले. त्यानंतरच्या सातव्या षटकात मुंबईने अंबाती रायुडूला (२) गमावले. तीन षटकांमध्ये तीन फलंदाज बाद झाल्यावर मुंबईच्या धावगतीला खीळ बसली. कर्णधार रोहित शर्माने सामन्याची सूत्रे हातात घेत पीयुष चावला आणि सुनील नरिन यांना चौकार लगावत स्थिरस्थावर होऊ पाहत होता. पण १२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नरिनला चौकार लगावणारा रोहित त्यानंतरच्याच चेंडूवर बाद झाला. रोहितने पाच चौकारांनिशी ३० धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर पोलार्डने संघाची जबाबादरी पेलायला हवी होती, पण त्यामध्ये तो सपशेल अपयशी ठरला. पंडय़ाने मात्र मुंबईच्या डावाला फक्त आकार दिला नाही तर त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. १५व्या षटकामध्ये मुंबईची ४ बाद ९९ अशी स्थिती होती. १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पोलार्डने षटकार लगावत संघाला शतकाचे माप ओलांडून दिले, पण त्यानंतर मात्र त्याला मोठे फटके मारता आले नाही. पोलार्डची कसर यावेळी पंडय़ाने भरून काढली. १७व्या षटकापासून पंडय़ाने एकामागून एक मोठे फटके मारत मुंबईला धावफलक पळता केला. १९व्या षटकात त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटच्या पाच षटकांमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता तब्बल ७२ धावांची लूट केली. पंडय़ाने दणकेबाज फलंदाजी करत ३१ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ४ बाद १७१ (हार्दिक पंडय़ा नाबाद ६१, किरॉन पोलार्ड नाबाद ३३; शकिब अल हसन २/२२) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १६६ (युसूफ पठाण ५२, गौतम गंभीर ३८; किरॉन पोलार्ड १/६).
मुंबईचा ‘हार्दिक’ विजय
आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात मुंबईने अखेर बाजी मारत कोलकाता नाइट रायडर्सवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत पाच धावांनी विजय मिळवला.
First published on: 15-05-2015 at 04:38 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 8 late heroics revive mumbai