विजयासाठी मिळालेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ तंबूत परतला होता आणि षटकामागे दहा धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत ख्रिस गेलरुपी वादळाने कोलकाता नाइट रायडर्सची  दाणादाण उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट्सने थरारक विजय मिळवला.
विराट कोहली आणि एबी डी’व्हिलयर्स हे  झटपट तंबूत परतल्यावरही गेलने खेळपट्टीवर ठाण मांडत मॅरेथॉन खेळी केली.  गेलने षटकारांची लयलूट केली. आठ धावा हव्या असताना गेल धावबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ७ षटकारांसह ५६ चेंडूत ९६ धावांची अविश्वसनीय खेळी केली. मात्र विजयाची पायाभरणी केलेल्या गेलचा मान राखत त्याच्या सहकाऱ्यांनी उर्वरित धावांचे आव्हान पेलले.
तत्पूर्वी, गौतम गंभीर आणि आंद्रे रसेल यांच्या दमदार खेळींच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने १७७ धावांची मजल मारली. रॉबिन उथप्पा आणि गंभीर यांनी ८१ धावांची सलामी दिली. उथप्पाने ३५ धावांची खेळी केली. गंभीरने  ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. आंद्रे रसेलने  १७ चेंडूत ४१ धावा फटकावल्या.   

Story img Loader