आयपीएल २०२३ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कोचीमध्ये काल संपन्न झाला. आयपीएल २०२३ हंगामासाठी होत असलेल्या या लिलावात टीम इंडियाचा एक खेळाडू आयपीएल करिअर संपण्यापासून वाचला आहे. या खेळाडूला अत्यंत स्वस्त दरात खरेदी करण्यात आले, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. आयपीएल २०२३ हंगामासाठी हा लिलाव सुरू होण्यापूर्वी, या खेळाडूची आयपीएल कारकीर्द संपेल आणि कोणताही संघ त्याला किंमतही देणार नाही, असे मानले जात होते, परंतु असे काहीही झाले नाही.
चेन्नई सुपर किंग्जने अजिंक्य रहाणेला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. गेल्या मोसमात संघाची कामगिरी चांगली नव्हती, अशा स्थितीत रहाणे संघाच्या मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आयपीएल २०२३ लिलावात (IPL 2023 Auction) चेन्नई व्यतिरिक्त कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. रहाणेने नुकतेच हैदराबादविरुद्ध द्विशतक झळकावले आणि सांगितले की तो वेगवान फलंदाजीही करू शकतो.
चेन्नईने आपल्या संघात खरेदी केल्यानंतर अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, सर्व चेन्नईच्या चाहत्यांना माझा नमस्कार…चेन्नईच्या परिवारात सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मी चेन्नईच्या संघात आणि चेपॉक मैदानात खेळण्यास खूप उत्सुक आहे, लवकरच भेटूया, असं अजिंक्य रहाणेने व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.
अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२२ हंगामासाठी १ कोटी रुपयांना खरेदी केले होते, परंतु आयपीएल २०२२ च्या ७ सामन्यांमध्ये तो केवळ १३३ धावा करू शकला होता. आयपीएल २०२२ मध्ये अजिंक्य रहाणेची खराब कामगिरी पाहून त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने यावर्षी सोडले. आता आयपीएल २०२३ हंगामाच्या लिलावात अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने ५० लाखांना विकत घेतले आणि त्याची संपणारी आयपीएल कारकीर्द वाचवली, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रहाणेला संघातून वगळण्यात आले होते. रहाणेने २०२० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचे शतक झळकावले होते. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध धडाकेबाज द्विशतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली.
रहाणेला चेन्नईने मूळ किमतीत विकत घेतले असून त्याने १५८ आयपीएल सामने खेळले आहेत. रहाणे मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. २००८ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या रहाणेने आतापर्यंत ४०७४ धावा केल्या आहेत. रहाणेने दोन शतके आणि २८ अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत. रहाणे गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानात उतरला होता पण त्याला छाप पाडता आली नाही.