आयपीएल सुरू होऊन एक आठवडा झाला. कौन कितने पनी में, याचा उलगडा हळूहळू होतोय. पहिलाच आठवडा असल्याने सगळीकडच्या खेळपट्ट्या चांगल्या होत्या. स्पर्धा पुढे सरकेल तशा खेळपट्ट्या मंद होऊ लागतील. जयपूर, चेन्नई, मुंबई इथल्या खेळपट्ट्या मस्तच होत्या. बॉल मस्त निघत होता आणि यष्टिरक्षकाच्या हातात संथपणे विसावत नव्हता तर ग्लोव्हसमध्ये धडकत होता. पहिल्या आठवड्यात म्हणूनच फास्ट बोलर्सची चलती होती. 
सगळ्या संघांची गोलंदाजी बघितल्यावर आतातरी असं वाटतयं की मुंबईची गोलंदाजी उजवी आहे. मिचेल जॉन्सनमुळे धक्का देणा-या गोलंदाजीची पोकळी भरुन निघाली. मलिंगा आणि जॉन्सन या १४० च्या गतीने बॉलिंग करणा-या गोलंदाजांमुळे मुंबईला एक वजन प्राप्त झाले आहे. एक उजव्या हाताचा राऊंड आर्म बॉलर आणि दुसरा डाव्या हाताचा राऊंड आर्म बॉलर अशी ही दुर्मिळ जुगलबंदी बघायला मिळतीये. जॉन्सनने अचूकता ठेवली तर पहिल्या सहा ओव्हर्समध्ये मुंबई विरुद्ध रन्स करणे अवघड वाटते. मलिंगा तर अचूक आहेच. हरभजन आणि ओझा हा भारताचा निम्मा स्पिन अ‍ॅटॅक मुंबई बाळगून आहे. इथून पुढे त्यांचा बोलबाला वाढेल. दिल्लीकडे मॉर्कल सोडला, तर बाकी कठीण वाटतयं. उमेश यादव बुंध्यातले बॉल विसरलाय. पठाणचा इनस्विंगर नक्की सुधारलाय. पण, वेग अजून वाढायला हवा. त्याचा आऊटगोईंग बॉल परिणामकारक झाला, तर हरवलेला पठाण पुन्हा मिळेल. पण लक्षणं चांगली आहेत. आशिष नेहरा पळायला लागला की त्याची गाडी कधीही ब्रेकडाऊन होईल, असे वाटते. आयपीएलमध्ये दहा-बारा सामने खेळून तो पुन्हा बेडकासारखा शीतकाल समाधी करता वनवासात जाईल ते डायरेक्ट पुढच्या आयपीएलपर्यंत. त्याने क्रिकेट हा खेळ खेळण्याकरता नाही तर विश्रांतीकरता निवडला, असं वाटतं. राजस्थानची श्रीशांत, टेट जोडी पण छान आहे. सिद्धार्थ त्रिवेदी कष्टाळू आहे. पंजाबची, हैदराबादची गोलंदाजी ठीक आहे. बेंगलोर मुरली कार्तिक, मुरलीधरनमुळे स्पर्धेच्या पुढच्या आठवडयात चमकेल. पुण्याच्या संघाचे एकूणचं सगळं अवघड दिसतंय; पुण्याच्या संघाच्या जाहिरातीत ‘हम आ रहे है आग लगाने के लिये’ असं काहीस वाक्य होत. वास्तवात आयपीएलच्या दोन मोसमात साधी शेकोटी पेटवण पण या संघाला जमलेल नाही. पुढच्या आठवड्यात चांगले स्पीनर्स आणि त्यांना चांगले खेळणारे फलंदाज चमकतील. भारतीय खेळाडूंकरता हा सुगीचा काळ असेल.
भारतीय खेळपट्ट्यांवर जिंकण्याकरता बॉलर्स महत्त्वाचे. त्यांनी सरावाच्यावेळेस प्रचंड कष्ट घेतले तर मॅचमध्ये फळ मिळेल. कडूनिंबाचा रस आहे तो. कडू असला तरी हितकारक.
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन विजयनाम संवत्सर तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात विजयी करो!
sachoten@hotmail.com 
BLOG: क्रिकेट कौशल्य आणि मनोरंजनाची भरीव कॅप्सुल
BLOG: जय जयवर्धने आणि लगोरी सम्राट! 

Story img Loader