ख्रिस गेल नामक वेस्ट इंडियन वादळाने टी-२० क्रिकेटमध्ये थैमान घातले आहे. अंपायर्स, बॉलर्स, फिल्डर्स आणि प्रेक्षकसुद्ध बॉल लागून कोसळणाच्या भितीने पुरते
घाबरले आहेत. क्लाईव्ह लॉईड आणि व्हिव्ह रिचर्डसनंतर वेस्ट इंडियन फलंदाजांची भीती वाटण बंद झालं होतं. लारा लालित्यपूर्ण फलंदाज होता. त्यांच्यात नजाकत होती. पण बॉलर्सची कत्तल करत खेळ खल्लास करणारा फलंदाज लॉईड, रिचर्डसनंतर झाला नाही. गेलने ती जागा नुसती भरून काढली नाही, तर व्यापून टाकली. तो त्या जागेवर आरूढ झाला. गेली अनेक वर्षे वेस्ट इंडिज क्रिकेटच्या झणझणीत झुणका भाकरीचे मिळमिळत शिकरण पोळीत रुपांतर झाले होते. वेस्ट इंडिज म्हंटलं की, आदरयुक्त भितीने जीभ बाहेर काढून कानाला हात लावणारे देश वेस्ट इंडिजमध्ये जाऊन त्यांना सहज हरवण्याची भाषा बोलत होते. हा काळ फार वेदनादायी होता. अजूनही आहे. पण गेलच्या रुपात नुसता आशेचा किरण नाही, तर क्षितीजावर सूर्योदय झाला आहे. टी-२०चा विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला. हा तोच शुभसंकेत आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात प्रत्येक देशाचं वेगळचारित्र्य आहे. ऑस्ट्रेलियाची विजीगीषु वृत्ती, इंग्लंडची पाठ्यपुस्तकी पद्धत, पाकिस्तानची लहरी चमत्कार, भारताची स्थितीप्रियता तसा वेस्ट इंडिजचा झंझावात. तो झंझावात आपण अनेक वर्ष मिस करत होतो. मिसळीत पोहे होते, फरसाण होता, चिवडा होता पण तर्री नव्हती. गेलने दिला कोल्हापुरी झटका.
टी-२० मध्ये गेल आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये, ऑस्ट्रेलियात बिगबॅशमध्ये, बांगलादेश लीगमध्ये, भारतात आयपीएलमध्ये भरपूर खेळला. १२० चेंडूच्या इनिंगमध्ये त्याच्या नावावर दहा शतकं आहेत. स्ट्राईक रेट १५०च्या वर सगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यावर त्याने धुमश्चक्री केलीये. तो क्रिजसोडून फार पुढे येत नाही. पण क्रिजमध्ये तो बॉलच्या लाईनप्रमाणे भरपूर हालतो. तो बॉल मारत नाही, तर बॉलवर तुटून पडतो. त्याच्या बॅकलिफ्टची आणि बॅटस्विंगची तुलना फक्त मिरवणुकीपुढे ध्वज नाचवणाऱया शिलेदारांशीच होऊ शकेल. शॉर्ट बॉलला पण तो आडव्या बॅटने खूप जोरात मिडविकेट, मिडॉनला मारू शकतो. असं वाटतं की, अनेक जन्म दाबून ठेवलेल्या रागाला, त्वेषाला तो वाट करून देतोय. यॉर्कर बॉलला पण लेंथ जोखून क्रिजमध्ये मागे सरकून बॉल खणून काढून तो स्टेडियममध्ये भिरकावतो आणि आपण डोळे मोठे करून, दोन्ही हात तोंडावर ठेऊन सर्द होऊन बघत बसतो. बॉलर्स हतबल आणि गलितगात्र होऊन स्टेडियममध्ये चाललेल्या बॉलकडे बघत असतात. नो पार्किंगमधून गाडी उचलून नेली, हे कळल्यावर त्या क्षणाला आपण कसे कावरेबावरे हतबल होतो तसे.
हा सगळा धुमाकूळ घालताना हा गृहस्थ हिमालयातील योग्याप्रमाणे. त्याचा चेहरा प्रचंड निर्विकार अगदी इस्त्रीकेल्यासारखा. ना आनंद ना दुःख. धुलाई करण्याचं कर्म फक्त चालू. मला तर त्याचा शांतपणा बघून बरेचदा असं वाटतं की कोणत्यातरी कोट्टणचुक्कादि किंवा वेल्याअरण्यादि नामक आयुर्वेदिक तेलाची शिरोधारा त्यांच्या डोक्यावर अदृष्यरुपात चालू असावी. त्याचाच तो परिणाम असावा.
तात्पर्य, हे की कसोटी क्रिकेटचा राजा ब्रॅडमननंतर सचिन (ऑस्ट्रेलियावाले पॉटिंग म्हणतील, वेस्ट इंडिजवाले लारा म्हणतील) वन डेचा राजा सचिन, तसा टी-२०चा अनाभिषिक्त सम्राट ख्रिस गेल झाला आहे. त्याचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली आहे. अंपायर्स आरोळी देतील, होशियार! येत आहे टी-२० क्रिकेटचा शहेनशहा, फलंदाजीचे नवाब, बॉलर्सचा कर्दनकाळ… ख्रिस गेल. बॉलर्स मुजरा करतील, पंख्याने वारा घालतील. आयसीसीचे अध्यक्ष राजाचा मुकुट गेलच्या मस्तकावर ठेवतील. आपण प्रेक्षक डोळे भरून, आनंदाने कौतुकाने कर्तृत्वाला सलाम करू. दाद देऊ. भारतीय क्रिकेटपटूनंतर आपले आवडते खेळाडू वेस्ट इंडिजचेचं नाही का?
sachoten@hotmail.com

Story img Loader