आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. हे दोन्ही संघ आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेले नाहीयेत. सनरायझर्स हैदराबाद दोन तर चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघप प्रयत्न करणार आहेत. मात्र फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड अवघ्या १६ धावांवर बाद झाला असून टी नटराजनने त्याचा त्रिफळा उडवला.

नाणेफेक जिंकून हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईचे सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानावर आपली जादू दाखवू शकले नाहीत. सुरुवातीला उथप्पा अवघ्या ११ धावा करुन झेलबाद झाला. त्यानंतर सलामीला आलेला ऋतुराज धडाकेबाज फलंदाजी करुन चेन्नईसाठी मोठी धावसंख्या उभी करेल असे वाटत होते. मात्र तोही मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही. १६ धावांवर खेळत असताना हैदराबादच्या टी नटराजने त्याचा त्रिफळा उडवला. नटराजनने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना ऋतुराज गोंधळला. परिणामी चेंडू थेट स्टंप्सवर जाऊन आदळला.

दरम्यान, मोईन अली वगळता चेन्नईचे इतर फलंदाज चांगल खेळ करु शकले नाहीत. अंबाती रायडू २७ धावांवर झेलबाद झाला. तर शिवम दुबे अवघ्या तीन धावा करुन तंबुत परतला. महेंद्रसिंह धोनीदेखील मैदानावर कमाल करु शकला नाही. तो तीन धावांवर असताना मार्को जान्सेनच्या चेंडूवर झेलबाद झाला.

Story img Loader