कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रविवारी होणाऱ्या आयपीएल २०-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर अनुभवण्याची संधी नाशिककरांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या योजनेंतर्गत मिळणार आहे.
मंडळाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील काही सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘सॅटेलाइट लिंक’द्वारे देशभरातील १४ निवडक शहरांमध्ये ‘आयपीएल फॅन पार्क’अंतर्गत केले असून या उपक्रमास त्या शहरांतील क्रीडाप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचा अशा प्रकारे आनंद देण्यासाठी मंडळाने नाशिकची निवड केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्याने तसेच मुंबई आणि पुणेव्यतिरिक्त महाराष्ट्रात क्रिकेटशी सर्वाधिक जवळीक साधणारे नाशिक हेच शहर असल्याने त्याची निवड करण्यात आल्याची माहिती समन्वयकाची भूमिका निभावणाऱ्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी समीर रकटे यांनी दिली. स्पर्धेच्या क्वॉलिफायर-२ सामन्याचे अशाच प्रकारे प्रक्षेपण भोपाळ येथे करण्यात येणार आहे.
शिवाजी स्टेडियममध्ये लावण्यात येणाऱ्या ३० बाय २२ फुटांच्या एलईडी पडद्यावर हे प्रक्षेपण करण्यात येणार असून स्टेडियममध्ये उपस्थित क्रीडाप्रेमींना थेट ईडन गार्डनमध्ये बसून आपण सामना पाहात आहोत, असा भास होण्यासाठी चिअरगर्ल्सचा अपवाद वगळता संगीतासह जे जे शक्य आहे, ते सर्व उपलब्ध करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शिवाजी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यास सुरुवात होणार असून प्रवेश विनामूल्य असल्याने सुमारे १० हजार नाशिककर या सामन्याचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा