IPL Playoffs Scenario: आयपीएल २०२३मध्ये प्लेऑफचे तीन संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी आपापल्या लढती जिंकून चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सने प्लेऑफचे तिकीट बुक केले. या दोघांपूर्वीच गुजरात टायटन्स अंतिम-४ मध्ये पोहोचला होता. त्यामुळे आता एकच जागा शिल्लक आहे. चार संघांचा लीगमधील प्रवासही संपला आहे. अशा स्थितीत उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्पर्धा आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी त्यांचे शेवटचे लीग सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरले. त्याचबरोबर गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता उर्वरित एका जागेसाठी मुंबई, बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. राजस्थानने आपले सर्व लीग सामने खेळले आहेत. त्याचवेळी मुंबई आणि बंगळुरूला शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. रोहित-विराटसमोर आपला सर्व अनुभव पणाला लावण्याची हीच ती वेळ आहे.
राजस्थानसाठी हे समीकरण सरळ आहे
राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण सरळ आहे. शेवटच्या दिवसाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला, तर राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा असेल. यात एकच संघ जिंकला किंवा पावसामुळे सामना रद्द झाला तरी राजस्थानचा प्रवास संपुष्टात येईल.
मुंबई आणि आरसीबी यांच्यात खरी लढत
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले होते. मात्र यावेळी दोन्ही संघांमध्ये स्पर्धा आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे १३-१३ सामन्यांत १४-१४ गुण आहेत. दोघांना शेवटचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे. मुंबईने हैदराबादला हरवायचे आणि आरसीबीला गुजरातविरुद्ध हरवायचे हे सोपे समीकरण आहे.
आरसीबीने गुजरातविरुद्ध जिंकल्यास मुंबई अडचणीत येईल. मुंबई आणि आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये ८० धावांचा फरक आहे. मुंबईने हैदराबादला ९० धावांनी पराभूत केले तर आरसीबी १० पेक्षा जास्त धावांनी जिंकणार नाही अशी आशा त्यांना करावी लागेल. म्हणजेच आज दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर ८० धावांचे असावे. टी२० मध्ये असे क्वचितच घडते. अशा स्थितीत गुजरातविरुद्धच्या विजयाने आरसीबीला प्लेऑफचे तिकीट सहज मिळू शकते.
आयपीएल २०२३मधील उर्वरित सामने
– मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२१ मे, दुपारी ३:३०)
– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स (२१ मे, संध्याकाळी ७:३०)