IPL Playoffs Schedule: आयपीएलच्या १६व्या हंगामात साखळी फेरीचे सामने संपले. ७० सामन्यांनंतर प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्याचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या पराभवाचा फायदा घेत अंतिम-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबी-गुजरात सामन्यात काय घडलं?

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून १९८ धावा केल्या. या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीकडून अनुभवी विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्यानंतर भारताचा युवा स्टार शुबमन गिलने नाबाद १०४ धावा केल्या. यावेळी युवा गिलच्या शतकाने अनुभवी कोहलीच्या शतक झाकोळले गेले.

गुजरातच्या विजयाने मुंबई कशी पोहचली प्ले ऑफ मध्ये?

रविवारी (२१ मे) गुजरात आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील आठवा विजय होता आणि त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचले. येथून, जर आरसीबीने त्यांच्या सामन्यात गुजरातला पराभूत केले असते तर त्यांना मुंबईच्या बरोबरीचे १६ गुण मिळाले असते आणि चांगल्या नेट रनरेटने प्लेऑफमध्ये पोहोचले असते. मात्र, तसे झाले नाही आणि आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवाचा फायदा मुंबईला झाला आणि प्लेऑफचे तिकीट मिळाले.

टॉप-४ मध्ये कोणते संघ आहेत?

गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी १४ पैकी १० सामने जिंकले. गुजरातने २० गुणांसह पहिले स्थान मिळविले. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी आठ सामने जिंकले. दोघांमधील एक सामना रद्द झाला. अशा प्रकारे चेन्नई आणि लखनऊचे १७-१७ गुण होते. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे चेन्नईने दुसरे स्थान पटकावले. तर लखनऊला तिसरे स्थान मिळाले. मुंबईला आठ विजयांतून १६ गुण मिळाले, ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

प्ले ऑफमध्ये कोण कोणाशी भिडणार?

प्लेऑफबद्दल बोलायचे झाले तर, सर्वप्रथम क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. यानंतर चेन्नईतच मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. क्वालिफायर-२ हा क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-१ च्या विजेत्याशी अंतिम सामना २८ तारखेला खेळेल.

हेही वाचा: IPL2023: ये दुख काहे खतम होता…, शुबमनच्या शतकाने विराट कोहलीसह मोहम्मद सिराजलाही अश्रू अनावर, पाहा Video

प्ले ऑफ वेळापत्रक (तारीख, सामना, संघ ठिकाण वेळ)

२३ मे क्वालिफायर-१ गुजरात विरुद्ध चेन्नई चेन्नई संध्याकाळी ७.३० वा

२४ मे एलिमिनेटर लखनऊ विरुद्ध मुंबई चेन्नई संध्याकाळी ७.३० वा

२६ मे क्वालिफायर-२ — अहमदाबाद संध्याकाळी ७.३० वा

२८ मे फायनल — अहमदाबाद संध्याकाळी ७.३० वा

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl playoffs schedule rcbs dream shattered by gujarats victory mi paltan enters play offs know full schedule avw
Show comments