बहुप्रतीक्षित आयपीएल रिटेन्शन धोरण शनिवारी स्पष्ट झालं आहे. आयपीएल संघांना ६ खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. संघ या खेळाडूंना रिटेन करू शकतात किंवा लिलावात राईट टू मॅच वापरून ताफ्यात कायम ठेऊ शकतात. या धोरणामुळे संघांना प्रमुख खेळाडू आपल्या ताफ्यात कायम करता येतील.
किती रक्कम संघांना मोजावी लागणार?
रिटेन करायच्या सहा खेळाडूंपैकी तीनसाठी १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी अशी रक्कम संघांना मोजावी लागेल. अन्य दोनसाठी १८ आणि १४ कोटी रुपये मोजावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूकरता ४ कोटी रूपये द्यावे लागतील. सहा खेळाडूंना रिटेन करणाऱ्या संघांला लिलावात १२० कोटींपैकी ४१ कोटी रुपयेच उपलब्ध असतील. सहापैकी पाच खेळाडू हे कॅप्ड म्हणजे राष्ट्रीय संघासाठी खेळलेले असणं अनिवार्य आहे.
सहा रिटेन खेळाडूंपैकी केवळ दोनच खेळाडू अनकॅप्ड म्हणजेच राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले असू शकतात.
प्रत्येक संघाला संघबांधणीसाठी १२० कोटी रुपये मिळणार आहेत.
अनकॅप्ड खेळाडू कोण असेल?
पाच वर्ष भारतासाठी न खेळलेला तसंच बीसीसीआयतर्फे करारबद्ध नसलेला खेळाडू अनकॅप्ड म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. या नियमामुळे चेन्नई सुपर किंग्स संघ महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकतो. धोनीने निवृत्ती स्वीकारून पाच वर्ष झाली आहेत आणि तो करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नाही. हा नियम नसता तर चेन्नईला प्रचंड मोठी रक्कम देऊन रिटेन करावं लागलं असतं. पण या नियमामुळे तुलनेने कमी पैसा मोजून चेन्नईला धोनीला आपल्या ताफ्यात कायम करता येईल. इम्पॅक्ट प्लेयर हा नियम २०२७ हंगामापर्यंत लागू राहील असं आयपीएल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा- IPL 2025: गौतम गंभीरच्या जागी धोनीचा खास मित्र, KKRचा मोठा निर्णय
दरम्यान लिलावात निवड झालेल्या पण हंगामापूर्वी अनुपलब्ध असणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे. अशा खेळाडूंवर दोन हंगामांसाठी बंदीची कारवाई केली जाईल.