आयपीएलच्या अकराव्या हंगामातील प्ले-ऑफच्या सामन्यांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. सनराईजर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे ४ संघ प्ले-ऑफच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. मात्र अकराव्या हंगामात या सामन्यांसाठीची चुरस अत्यंत शिगेला पोहचली होती. अखेरच्या क्षणांपर्यंत कोणता संघ सर्वोत्तम ४ जणांच्या गटात स्थान मिळवले हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र १९ मे रोजी हैदराबादच्या मैदानात कोलकात्याने सनराईजर्स हैदराबादवर मात करुन आपलं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत केलं. ख्रिस लिन, सुनील नरीन, रॉबिन उथप्पाची फटकेबाजी आणि गोलंदाजीत प्रसिध कृष्णाचा भेदक मारा या जोरावर कोलकात्याने हैदराबादच्या संघाला धोबीपछाड दिला.

मात्र या निर्णायक सामन्याआधी कोलकात्याचा संघमालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा भलताच अस्वस्थ होता. आपल्या संघाच्या निर्णयाक सामन्याआधी शाहरुख संपूर्ण दिवस जागा होता. सामना जिंकल्यानंतर आपल्या संघातील खेळाडूंचे हसरे चेहरे पाहिल्यानंतर शाहरुख खानने ट्विटरवर आपल्या सर्व खेळाडूंचे आभार मानत, तुमचे आनंदी चेहरे पाहण्यासाठी मी २४ तास जागा होतो असं म्हटलं आहे.

मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघाला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर कोलकात्याने दमदार पुनरागमन करत, प्ले-ऑफमध्ये आपली जागा निश्चीत केली होती. प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये कोलकात्याची गाठ राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास कोलकात्याला राजस्थानवर मात करावी लागणार आहे. या दोन संघांमधील सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपणार आहे. त्यामुळे आपल्या आगामी सामन्यात कोलकात्याचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader