आयपीएलच्या सामन्यांसाठी पवना धरणाचं पाणी वापरायला, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मनाई केली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने, आयपीएलच्या सामन्यांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करणार यासंदर्भात विचारणा केली होती. ‘लोकसत्ता’ संघटनेतर्फे आयपीएल सामन्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोकसत्ता संस्थेने दाखल केलेल्या याचिकेनुसार, आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळपट्टीची निगा राखायला ६० लाख लिटर पाण्याची नासाडी होईल असं म्हटलं आहे. या कारणामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळवू नयेत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सध्या महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ, पुण्यातील गहुंजे मैदानावर आपले घरचे सामने खेळणार आहे. चेन्नईत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन झालेला विरोध लक्षात घेता आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने चेन्नईतले सामने पुण्याला हलवले होते.