चेन्नई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात चेन्नईने निसटता पण थरारक विजय मिळवला. या सामन्यात फाफ डू प्लेसीस याने शानदार अर्धशतक झळकावले आणि नाबाद राहून संघाला जिंकवून दिले. या विजयामुळे चेन्नईचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला. मात्र या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबईकर शार्दूल ठाकूरची.
चेन्नईला विजयासाठी कमी चेंडूत जास्त धावांची गरज होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर ८ गडी बाद झाल्यावर मैदानावर आला आणि त्याने निर्णायक क्षणी ५ चेंडूत १४ धाव ठोकल्या. या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नईने शेवटच्या षटकात सामना सहजपणे जिंकला. पण आयपीएलमध्ये जरी शार्दूल त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जात असला, तरी शालेय जीवनात त्याने फलंदाजीच्या जोरावरही मैदान गाजवले आहे.
त्याच्या शालेय कारकिर्दीत एकदा शार्दूलने एकाच षटकात सहा षटकार मारण्याची किमया केली होती. २००६ साली शालेय स्तरावर प्लेट डिव्हिजन हॅरिस शिल्ड स्पर्धा सुरु असताना एस राधाकृष्णन संघाविरुद्ध स्वामी विवेकानंद स्कूल शार्दूल खेळत होता. तेव्हा त्याने ही कामगिरी केली होती.
फिरकीपटू विशाल ध्रुव याच्या गोलदांजीवर शार्दूलने हे षटकार लगावले. विशेष म्हणजे, हे सहाच्या सहा षटकार त्याने मिडविकेटच्या डोक्यावरून फटकावले होते आणि त्या सामन्यात शार्दुलने ७३ चेंडूत १६० धावा केल्या होत्या. या खेळीत १० षटकार आणि २० चौकारांचा समावेश होता.