दिल्ली आणि चेन्नई यांच्यादरम्यान शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा धक्कादायक पराभव केला. या सामन्यात चेन्नईला प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे १६३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा ३४ धावांनी पराभव झाला. मात्र या सामन्याला सुरुवात होण्याआधी नाणेफेक करण्याच्या वेळी एक अशी गोष्ट घडली की मैदानावर शांत आणि संयमी असलेला धोनीदेखील खो खो हसू लागला.

सामन्याच्या नाणेफेकीसाठी चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर हे दोघे सामनाधिकाऱ्यांबरोबर मैदानावर उपस्थित राहिले. त्यावेळी टॉससाठी नाणे हवेत उडवण्याची वेळ श्रेयसची होती. श्रेयसने टॉससाठी नाणे उडवले, पण ते नाणे उडून अपेक्षेपेक्षा खूप लांब जाऊन पडले. ही घटना पाहून धोनी आणि इतर सामनाधिकाऱ्यांना हसू आवरलं नाही. ते सगळे खो खो हसू लागले.

असे झाले असले तरी सामन्याची नाणेफेक दिल्लीने जिंकली आणि सामनाही दिल्लीनेच जिंकला. इतके लांब नाणे उडवण्याबाबत जेव्हा श्रेयस अय्यरला विचारले तेव्हा तो म्हणाला की धोनी एक महान खेळाडू आणि कर्णधार आहे. त्याच्या बाजूला टॉससाठी उभं राहणं म्हणजे माझं भाग्यच. टॉससाठी माझ्या बाजूला स्वतः धोनी उभा आहेत हे मला खरंच वाटत नव्हतं आणि म्हणून मी नर्व्हस झालो आणि माझ्या हातून नाणं लांब उडालं, असं तो म्हणाला.

Story img Loader