क्रिकेटचे सामने सुरु असताना चाहत्यांनी मैदानावर येणे ही काही खेळाडू आणि चाहत्यांसाठी नवीन बाब नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते महेंद्रसिंह धोनीपर्यंत सगळ्यांना याचा अनुभव आला आहे. आयपीएलच्या याच हंगामात गुरुवारी एका चाहत्याने धोनीला पायाला हात लावून नमस्कार केल्याची घटना घडलेली असतानाच राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या बाबतीतही एक किस्सा घडला आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान विरुद्ध पंजाब हा मंगळवारी झालेला सामना पुन्हा एकदा चाहत्यामुळे चर्चेत आला. राजस्थानाची गोलंदाजी सुरु असताना हा प्रकार घडला. पंजाबचा संघ १५९ धावांचा पाठलाग करत होता. पंजाबला १२ चेंडूत ४८ धावांची गरज होती. राजस्थानच्या जोफ्रा अर्चरने पहिल्या ३ चेंडूत केवळ ४ धावा दिल्या. तो चौथा चेंडू टाकणार इतक्यात एक चाहता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुरक्षेची जाळी ओलांडून अजिंक्यच्या दिशेने आला आणि त्याने अजिंक्य राहणेशी हस्तांदोलन केले. हा प्रकार पाहताच सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला त्वरेने मैदानाबाहेर नेले.
या घटनेचा आपल्या नेतृत्वकौशल्यावर कोणताही परिणाम होऊ न देता अजिंक्यने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि राजस्थानने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.