चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात दोनही संघ आपले सर्वोत्तम ११ खेळाडू संघात घेऊन खेळत आहेत. गेल्या वर्षीच्या आणि आजच्या अंतिम सामन्यांत गोष्टी समान आहेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी दोन संघांपैकी एका संघाचा कर्णधार हा महेंद्र सिंग धोनी होता. आजही एका संघाचा कर्णधार धोनी आहे. फरक हा फक्त संघाचा आहे. २०१७ साली तो पुणे संघाकडून खेळत होता. तर आज तो चेन्नईचा कर्णधार म्हणून खेळत आहे.

मात्र याबरोबरच एक अजब आणि एका खेळाडूसाठी काहीशी धक्कादायक म्हणता येईल अशी एक गोष्ट या सामन्यात समान आहे. ती म्हणजे चेन्नईच्या संघाने आज हरभजन सिंगला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागी लेगस्पिनर करण शर्मा याला संघात स्थान देण्यात आले आहे. योगायोग म्हणजे गेल्या वर्षी अंतिम सामना हा मुंबई आणि पुणे या दोन संघात झाला होता. या सामन्यातही हरभजन सिंग याला वगळण्यात आले होते. संघात फिरकीपटू म्हणून करण शर्मा याला संघात प्ले-ऑफपासून स्थान देण्यात आले होते.

हरभजन सिंग हा गेले १० हंगाम मुंबईच्या संघाकडून खेळत होता. या वर्षी त्याला चेन्नईच्या संघाने खरेदी केले. आज अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर आहे. हरभजनला वानखेडेच्या खेळपट्टीचा गेल्या १० वर्षाचा अनुभव आहे. तरीही त्याला वगळण्यात आले आहे. हैदराबादचा लेगस्पिनर रशीद खानने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कदाचित लेगस्पिनर म्हणून करण शर्माची चेन्नईच्या संघात वर्णी लागली आहे, अशी चर्चा आहे.

दरम्यान, मुंबईने हरभजनला वगळूनही अंतिम सामना जिंकला होता. तीच पुनरावृत्ती चेन्नईबाबत होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader