आठवड्याभरापूर्वी बंगळुरुत पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत, इंग्लंडविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी अंबाती रायडूची निवड करण्यात आली. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अंबाती रायडूने हैदराबादविरुद्ध शतक झळकावत आपली निवड १०० टक्के योग्य असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. अंबाती रायडूच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर ८ गडी राखून मात केली. रायडूने झळकावलेलं शतक हे आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं चौथ शतक ठरलं आहे. याचसोबत आयपीएलमधलं रायडूचं हे पहिलचं शतक ठरलं आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रायडूने ६२ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. रायडूच्या या खेळीत ७ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याआधी अकराव्या हंगामात शेन वॉटसन, ख्रिस गेल आणि ऋषभ पंत यांनी शतक झळकावलं आहे. रायडूच्या या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
I am overjoyed for Ambati Rayudu. Was asked to perform a different role this year and has played it stirringly.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 13, 2018
सामना संपल्यानंतर अंबाती रायडूने आपला किताब स्विकारताना, भारतीय संघात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सध्या मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो आहे. शेन वॉटसनसोबत खेळताना आम्ही एकमेकांना सांभाळून घेत मैदानात वावरत असतो. याच कारणामुळे मी मैदानात खुलून फटकेबाजी करु शकत असल्याचं रायडू म्हणाला.