सुनील नरीनची फटकेबाजी आणि नितीश राणा-दिनेश कार्तिक यांच्यातल्या भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आपल्या पहिल्याच सामन्यात पराभव केला. मात्र बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमने कालच्या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पार करणारा मॅक्युलम हा दुसरा फलंदाज ठरला आहे. मॅक्युलम व्यतिरीक्त वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सध्य़ा ख्रिस गेलच्या खात्यात ११ हजार ६८ धावा जमा आहेत.

९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मॅक्युलमला अवघ्या ८ धावांची गरज होती. कोलकात्याच्या विनय कुमारच्या गोलंदाजीवर पहिल्याच डावातील चौथ्या चेंडूवर षटकार खेचत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या सामन्यात मॅक्युलमने २७ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात तो अयशस्वी ठरला.