आयपीएलच्या अकराव्या हंगामात सध्या चेन्नई सुपरकिंग्जचा संघ चांगल्याच फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये केवळ २ पराभव पदरी पडलेल्या चेन्नईने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे गतविजेत्या मुंबईची यंदाच्या हंगामात फारशी आश्वासक सुरुवात झालेली नाही. आयपीएलच्या मैदानात चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात रंगणार युद्ध हे सर्वांनाच माहिती आहे. मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावरही दोन्ही संघाचे चाहते एकमेकांना ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या ट्विटर हँडलवरुन सुरेश रैना आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत सचिनचा उल्लेख चक्क त्याच्या वडीलांच्या नावावरुन म्हणजेच रमेश असा करण्यात आला आहे.

हा प्रकार चाहत्यांना समजताच, ट्विटरवर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी चेन्नई सुपरकिंग्जने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचं म्हणतं चेन्नईच्या संघावर टिकेची झोड उठवली आहे.

सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. मात्र मुंबईला पहिल्या चार जणांमध्ये यायचं असल्यास उर्वरित सहाही सामने जिंकावे लागणार आहेत. सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही मुंबई आणि सचिनचं एक अतुट नातं आहे. अशा परिस्थितीमध्ये चेन्नईच्या संघाने सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात आणि मुंबईचा संघ आपल्या देवाचा झालेला अपमान भरुन काढतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader